Rabi Seesion 2024 :
मोहन बोराडे :
रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा पिकाची लागवड केली जात आहे. मात्र, गळीत धान्यातील करडई आणि सूर्यफूल पिकाचे क्षेत्र आता कमी होत असून, बाजारपेठेत चांगला भाव मिळत असला तरी शेतकऱ्यांनी मात्र, याकडे पाठ फिरविल्याची परिस्थिती दिसून येत आहेत.
सेलू तालुक्यातील केवळ ७७ हेक्टर क्षेत्रावर करडी, सूर्यफुलाची पेरणी केल्याचे पुढे आले आहे. घटते गळीत धान्याचे क्षेत्रामुळे आगामी काळात करडई व सूर्यफूल रब्बी हंगामातून हद्दपार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यंदा मान्सून वेळेवर दाखल झाल्यानंतर जून महिन्याच्या अखेरपर्यंत खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर व मूग आदी पिकांची लागवड पूर्ण झाली होती. शेतकऱ्यांनी महागडी बियाणे, औषधी, खते विकत घेऊन कापूस आणि सोयाबीन पिकातून चांगले उत्पन्न काढण्यासाठी मेहनत घेतली होती.
तसेच जुलै व ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील पिके बहरात आली होती. त्यामुळे यावर्षी चांगले उत्पन्न हाती लागेल या आशेवर शेतकरी होते. परंतु, ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी सेलू तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला होता.
शिवाय मुसळधार पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून सोयाबीन, कापूस, तूर पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. नदी, नाल्या काठच्या जमिनी अतिवृष्टीमुळे खरडून गेल्या होत्या. मुसळधार पावसामुळे अनेक दिवस शेतात पाणी साचून राहिल्यामुळे कापूस आणि सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला होता. खरिपातील नुकसान भरून काढण्यासाठी रब्बी हंगामाची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे.
अतिवृष्टी झाल्यामुळे विहीर, बोर, शेततळे व निम्न दुधना प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात सर्वाधिक क्षेत्रावर हरभरा पेरणी झाली आहे. तसेच गहू, ज्वारी पेरणी केली आहे. करडई व सूर्यफूल या पिकांना बाजारपेठेत चांगला भाव असला तरी ही पिके काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने दरवर्षी करडई व सूर्यफूल पिकाचे क्षेत्रात घट होत आहे. बाजारपेठेत करडई व सूर्यफूल तेलाला सर्वाधिक मागणी आहे.
मात्र, या पिकांचे सरासरी उत्पादन कमी होते. तसेच करडई व सूर्यफूल ही पिके तीन महिन्यात काढणीला येते. सूर्यफूल लागवड केल्यानंतर तीन ते चार वेळा पाणी द्यावे लागते. तसेच सूर्यफूल पीक आल्यानंतर पक्षीच जास्त खातात. त्यामुळे पक्ष्यांपासून पिकाचा बचाव करण्यासाठी राखण ठेवावा लागतो. याचा खर्च अधिक लागत असल्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकांकडे पाठ फिरवली आहे.
हंगामात सर्वाधिक हरभऱ्याचे क्षेत्र वाढले
• रब्बी हंगामात सर्वाधिक ११ हजार ७४७ क्षेत्रावर हरभरा, गहू १०९५ हेक्टर, ज्वारीची ८ हजार १३० हेक्टर क्षेत्रावर लागवड केली आहे.
• करडई व सूर्यफूल या पिकांना बाजारपेठेत चांगला भाव असला तरी ही पिके काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने दरवर्षी करडई व सूर्यफूल पिकाचे क्षेत्रात घट होत आहे.
• जिल्ह्यात ज्वारीचा पेरा वाढला असला तरी करडईचा पेरा मात्र घटला आहे. केवळ घरच्या पुरते तेल निघेल, याच पद्धतीने काही शेतकऱ्यांनी करडईची पेरणी केली आहे.
करडईचा पेरा वाढवा, यासाठी शासनाने पुढाकार घेतला असला तरी शेतकऱ्यांकडून त्यास प्रतिसाद मिळत नाही.
३२ हजार हेक्टर पेरणी क्षेत्र
• अतिवृष्टी झाल्यामुळे समाधानकारक पाणी उपलब्ध असल्यामुळे रब्बी हंगामातील हरभरा व गव्हाचे क्षेत्र वाढले आहे, अतिवृष्टीमुळे सर्वाधिक फटका कापसाला बसल्यामुळे दोन वेचणीतच कापसाचा झाडा झाल्यामुळे शेतकरी कापूस उपटून हरभरा पीक घेत आहे. त्यामुळे यावर्षी ३२ हजार हेक्टरवर रब्बी हंगामातील पिकांची लागवड होण्याची शक्यता आहे.
• रब्बीत इतर पिकांची क्षेत्र वाढत असले तरी करडी व सूर्यफूल ही गळीत धान्य हद्दपार होण्याच्या मार्गावर आहेत. पूर्वी आंतरपिकात सूर्यफूल व करडी शेतकरी घेत असत. परंतु, मागील आठ ते दहा वर्षांपासून गळीत धान्यातील सूर्यफूल व करडी पिकाचे क्षेत्र कमी झाले आहे.