Rabi Season 2024 :
छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी दुसऱ्या टप्प्यात असताना बळीराजा मात्र रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीत व्यस्त झाल्याचे दिसत आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागातील तीन जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ९४ हजार ४४ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. दरवर्षी सरासरी होणाऱ्या एकूण पेरणीच्या ३९ टक्के क्षेत्र असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.
खरीप हंगामातील पिके काढणीला आली तेव्हा झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. यातून सावरत आता रब्बी पिकांची पेरणी सुरू केली आहे. कृषी विभागाच्या छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो.
या जिल्ह्यांत खरीप हंगामात सरासरी ७ लाख २७ हजार २३७ हेक्टरवर पेरणी होते. ती जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुरू असते. सध्या ज्वारी, गहू, हरभरा, मका आणि तेलवर्गीय पिकांची पेरणी सुरू आहे. कृषी विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी १ लाख ९० हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी होते. यापैकी आतापर्यंत २६ हजार २६१ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
तर जालना जिल्ह्यात रब्बीचे २ लाख १६ हजार ४०० हेक्टर क्षेत्र आहे. यातील ८५ हजार ५४७ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
बीड जिल्ह्यातील पेरणीचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. येथे ३ लाख ३१ हजार ४२ हेक्टर रब्बीचे क्षेत्र आहे. यापैकी १ लाख ८२ हजार २६६ हेक्टरवर पेरणी झाल्याची माहिती येथील विभागीय कृषी सहसंचालक तुकाराम मोटे यांनी दिली.
संभाजीनगर जिल्ह्यात सर्वांत कमी पेरणी
रब्बी हंगामात गहू, ज्वारी आणि हरभरा या प्रमुख पिकांकडे शेतकऱ्यांचा कल असतो. असे असले तरी रब्बी ज्वारीची पेरणी सर्वच जिल्ह्यात झाल्याचे दिसून येते. यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ६८ हजार ८२२ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. तर सर्वात कमी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केवळ १५ हजार ३३० हेक्टरवर ज्वारी पेरणी केली.
कोणत्या जिल्ह्यात किती टक्के पेरणी
छत्रपती संभाजीनगर | ९.१९% |
जालना | ४५.६०% |
बीड | ५५.०५% |