Pune : खरीप हंगामातील पिके काढणीला सुरूवात झाली असून रब्बी हंगामाची तयारी कृषी विभागाने सुरू केली आहे. दरम्यान, अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके व राष्ट्रीय खाद्य तेल अभियान गळीतधान्य पिके २०२४-२५ अंतर्गत रब्बी हंगामामध्ये पीक प्रात्यक्षिके तसेच प्रमाणित बियाणे वितरण या बाबींचे नियोजन करण्यात आलेले आहे.
चालू वर्षी हरभरा, गहू, जवस , करडई, भूईमुग, व मोहरी या पिकांचे महा-डीबीटी प्रणालीद्वारे बियाणे या घटकासाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. पीक प्रात्याक्षिके ही बाब शेतकरी गटामार्फत राबविली जाणार आहेत.
पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला १ एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला आवश्यक असणाऱ्या बियाण्यांचा २ हेक्टर मर्यादेत लाभ देय असणार आहे.
या निविष्ठांचा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर दि. २८ सप्टेंबर २०२४ ते दिनांक ६ ऑक्टोबर २०२४ पर्यंत बियाणे, औषधे व खते या टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.