Join us

Rabi season : लोअर दुधना प्रकल्पांतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था; पाणी आवर्तन कधी जाहीर करणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 5:40 PM

पावसामुळे निन्म दुधना प्रकल्पात मुबलक जलसाठा झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पाणी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. वाचा सविस्तर (Rabi season)

Rabi season : 

अनिल जोशी / झरीः परभणी जिल्ह्यातील शेकडो हेक्टर जमीन निम्न दुधना प्रकल्पामुळे सिंचनाखाली आली आहे. दरवर्षी जालना पाटबंधारे विभाग व माजलगाव कालवा विभाग क्रमांक १० या दोन विभागांकडून रब्बी व उन्हाळी पिकांसाठी पाणी आवर्तनाचे नियोजन केले जाते. मात्र, यंदा या विभागाला पाणी आवर्तनाचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. ऑक्टोबर महिना सुरू झाला तरी कालवा सल्लागार समितीची बैठक झालेली नाही. परिणामी, शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

यंदा दमदार पावसामुळे निन्म दुधना प्रकल्पात मुबलक जलसाठा झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पाणी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सध्या खरिपातील सोयाबीन पेरणी आटोपली असून, शेतकरी रब्बी हंगामाची तयारी करत आहेत. 

दुसरीकडे मात्र पाणी आवर्तनाचे नियोजन करणाऱ्या विभागाची मात्र तयारी होताना दिसत नसल्याने शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत. रब्बी हंगाम पाणी आवर्तनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक होत असते. 

यंदा मात्र ऑक्टोबर महिना उजाडला तरी अद्यापही पाणी आवर्तनाच्या हालचाली दिसत नसल्याची स्थिती आहे. पाणी आवर्तन जाहीर झाले असते तर शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचे नियोजन करता आले असते. मात्र, अद्यापही याकडे लक्ष दिले जात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

गहू, हरभरा पेरा अधिक

• खरिपात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पेरणी केली जाते. सोयाबीन काढणीनंतर शेतकरी गहू, हरभरा, भुईमूग, ज्वारी आदी पिकांची पेरणी करतात. यात सर्वाधिक क्षेत्रावर हरभरा, गव्हाची पेरणी होते.

• बहुतांश शेतकऱ्यांची पेरणी पाणी नियोजनानुसार अवलंबून असल्याने सर्वांचे लक्ष बैठकीकडे लागले आहे.

लोअर दुधनाच्या ओलिताचा भाग जिल्ह्यात सर्वाधिक आहे, मात्र, प्रशासनाच्या समन्वय अभावी पाणी आवर्तन अद्याप जाहीर झालेले नाही. - संतोष देशमुख, शेतकरी

पाणी आवर्तन जाहीर झाले तर हरभरा, गहू पीक घेता आले असते. अद्यापपर्यंत पाणीपाळी जाहीर न झाल्यामुळे शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत. - मोसिन काजी, शेतकरी

पाणी आवर्तन जाहीर न झाल्यामुळे मला गव्हाचा पेरा जास्त ठेवायचा होता. परंतु, अद्यापही पाणी जाहीर न झाल्यामुळे सदरील शेतात मला ज्वारीचे पीक घ्यावे लागले. त्यामुळे माझे मोठे नुकसान झाले आहे. - ब्रह्मानंद सावंत, शेतकरी

कालवा समितीची कामे जालना पाटबंधारे विभागांतर्गत येतात. माझ्याकडे फक्त सिंचन विभाग आहे. - प्रसाद लांब, कार्यकारी अभियंता, माजलगाव कालवा

प्रशासन लक्ष कधी देणार

सप्टेंबर अखेर किंवा ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीस कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन पाणी आवर्तनाचे वेळापत्रक जाहीर करणे अवश्यक असताना परभणी, जालना या दोन जिल्ह्यांच्या समन्वय अभावी रब्बी आवर्तन रखडल्याची स्थिती आहे.  याकडे दोन्ही जिल्ह्यांचे प्रशासन लक्ष कधी देणार? असा सवाल उपस्थित होत आहे.    

टॅग्स :शेती क्षेत्ररब्बीशेतकरीशेती