- रविंद्र शिऊरकर
मराठवाड्याच्या विविध भागात गेल्या तीन चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने या मुळे कांदा, गहू, ज्वारी, हरभरा, करडई आदी रब्बी पिकांवर मावा, करपा, आणि बुरशीजन्य किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आधीच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते त्यातून सावरत काहींनी पुन्हा शेतमळे पिकांच्या हिरवळीने फुलवले. मात्र, आता ढगाळ वातावरणामुळे पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ज्यामुळे काही प्रमाणात उत्पन्न घट होईल तसेच पिकांची वाढ कमी होईल व त्याबरोबर फवारणी खर्चात वाढ होणार आहे.
लाल कांदा सध्या काढण्याच्या स्थितीत असून पोळ वाफेचा रांगडा कांदा मात्र आकार घेण्याच्या स्थितीत आहे. तर उन्हाळी कांदा लागवड बऱ्याच ठिकाणी अद्याप देखील सुरु असून काही ठिकाणच्या लागवडी गेल्या आठवड्यात पूर्ण झाल्या होत्या. तिथे जमिनीत ओलावा असल्याने पाणी देता येत नाही, त्यातच वातावरण बदल एवढ्या कमी वयाच्या कांद्याला सहन करता येत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहे.
गहू हरभरा ज्वारी आणि करडई
घरी खाण्यासाठी व अधिकचे उत्पन्न झाले तर ते विक्रीसाठी या हेतूने बरेच शेतकरी गहू, हरभरा, ज्वारीची लागवड करतात. या सोबतीला आता करडई पीक आले आहे. या वर्षी सुरुवातीपासून दुष्काळजन्य स्थिती असल्याने रब्बी हंगामात कोरडवाहू एका पाण्यात येणारे पीक म्हणून करडईकडे बघितले जाते. तसेच हल्ली वाढणारे आजार, रासायनिक प्रक्रियेतून तयार होणारे खाद्य तेल यातून आपल्या घरी घाण्यातून काढलेले तेल असावे या हेतूने चालू वर्षी रब्बी करडई चे लागवड क्षेत्र वाढले आहे. तर दुसरीकडे गहू, हरभरा, ज्वारी यांचे क्षेत्र घटल्याचे दिसून येते. सध्या वातावरणीय बदल हे सर्व पीके १५ दिवस ते ३५ दिवस दरम्यान असल्याने सहन करत नाही आणि विविध प्रदुर्भावांना बळी पडत आहे.