Rabi Season
हिंगोली : जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला असून तब्बल २ लाख १३ हजार ३७७ हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाची पेरणी होण्याची शक्यता आहे. यात शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती हरभरा व गव्हालाच राहणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामात ३ लाख ८२ हजार ९०२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. खरीप हंगाम चांगला जाईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेला घास हिरावला. उडीद, मुगासह सोयाबीन पिकांना मोठा फटका बसला. संकटातून वाचलेले सोयाबीन कापणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
काही दिवसात रब्बी हंगामाच्या पेरणीला गती येण्याची शक्यता आहे. दरम्यान, कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी लागणारे बियाणे, खत उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन केले आहे.
अतिवृष्टी झाल्याने रब्बी हंगाम चांगला येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. तब्बल २ लाख १३ हजार ३७७ हेक्टर क्षेत्रावर रब्बीचा पेरा होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. यात सर्वाधिक पेरा हरभरा, गव्हाचा होण्याची शक्यताही वर्तविली आहे.
धरण, तलावात मुबलक साठा
जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे धरण, तलावात मुबलक पाणीसाठा तयार झाला आहे. यात इसापूर, सिद्धेश्वर, येलदरी धरण १०० टक्के भरले आहे. मुबलक पाणीसाठा असल्याने पिकांना पाणी मिळणार आहे.
हरभरा, गहू, करडईला राहणार पसंती
■ जिल्ह्यात खरीप हंगामात २ लाख ७६ हजार ४०३ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला होता.
■ सिंचनाची सुविधा नसलेले शेतकरी हरभरा पिकाला तर सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी गव्हाला पसंती देतात.
■ त्यामुळे १ लाख ५६ हजार ७५० हेक्टरवर हरभरा तर १६ हजार ९०० हेक्टरवर गव्हाची पेरणी होण्याचा अंदाज आहे.
■ तसेच ३९१ हेक्टरवर करडईचे पीक घेतले जाण्याची शक्यता आहे.
असे आहे रब्बीचे प्रस्तावित क्षेत्र (हे.)
पिक | प्रस्तावित क्षेत्र |
हरभरा | १५६७५० |
गहू | ३६०४६ |
रब्बी ज्वारी | १६९०० |
करडई | २२३० |
रब्बी मका | ४७९ |
सूर्यफूल | ३९१ |
जवस - तीळ | ४ |
४५ हजार १८१ क्विंटल बियाणांची मागणी
जिल्ह्यातील रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी सार्वजनिक व खासगी मिळून जवळपास ४५ हजार १८१ क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली आहे.
यातील ८ हजार ७३५ क्विंटल बियाणांचा पुरवठाही करण्यात आला आहे.