शेषराव शिरसाट
सततच्या पावसामुळे अर्ध रब्बी हंगामातील तूर व ओवा पिकांची पेरणी हुकल्यामुळे शेतकऱ्यांची घोर निराशा झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुढील नियोजन हरभरा पिकांचे करण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे.
आगर परिसरात मोठ्या प्रमाणावर कापूस व सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. बियाणे अंकुर अवस्थेत असतानाच नदी-नाल्यांना पूर आला व पिके खरडली.
यामुळे नदी-नाल्यांच्या काठावरील शेती असलेल्या शेतकऱ्यांनी अर्ध रब्बी हंगामातील तूर व ओवा पिकांचे नियोजन केले होते; मात्र गेल्या दोन महिन्यांपासून सतत पाऊस सुरू असल्याने शेती मशागतीची कामे ठप्प पडली आहेत.
कृषी विभागाच्या शिफारशीनुसार अर्ध रब्बी हंगामातील पेरणी १५ ऑगस्ट- १५ सप्टेंबर दरम्यान होणे गरजेचे आहे. आणखी दोन आठवड्यापर्यंत शेतातील चिखल कमी होणार नसल्याने ओवा, तूर पेरणीचे नियोजन कोलमडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दारोमदार आता रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी पिकावर अवलंबून आहे.
खरिपाच्या पिकांना पुराच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर तडाखा बसला होता. अशा शेतात अर्ध रब्बी तूर बियाण्याची पेरणी करणार होतो. पण शेत पेरणी योग्य नसल्याने नियोजन रद्द केले. पुढे हरभऱ्याची पेरणी करावी लागणार आहे. - अनंत अहिर, शेतकरी,गोत्रा
चोंडा नाल्याच्या पुराने खरिपाच्या पेरण्या खरडल्या. त्यामुळे तूर पेरणीचे नियोजन केले होते; मात्र शेत पेरणी योग्य नसल्याने नियोजन कोलमडले. - रवींद्र शिरसाट, शेतकरी, आगर
अर्ध रब्बी हंगामातील पेरणी १५ ऑगस्ट- १५ सप्टेंबर दरम्यान होणे गरजेचे आहे, अन्यथा उत्पन्नात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. - रेणुका टाके, कृषी सहायक, आगर
खरिपाच्या पेरण्या पूर्ण होताच पावसाने थैमान घातले. त्यामुळे नदी- नाल्यांना पूर आल्याने पिकांचे नुकसान झाले. दुबार पेरणीच्या भानगडीत न पडता अर्ध रब्बी हंगामात तूर व ओवा पेरणीचे नियोजन केले होते; सतत दोन महिन्यापासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेती मशागतीची कामे ठप्प झाली. तूर व ओवा १५ सप्टेंबर दरम्यान पेरणी होणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास उत्पन्न बुडीत खात्यात जमा होईल, अशी भीती आहे. आता रब्बी हंगामातील हरभरा पिकांची तयारी करू. - हरिश शर्मा, शेतकरी, पाळोदी