Join us

Rabi season : अनुदानावरील बियाण्यांची प्रतीक्षा; रब्बीसाठी विकतचे बियाणे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 12:27 PM

शेतकरी बियाण्यांसाठी कृषी विभागात चकरा मारीत असून विभागाच्यावतीने एक-दोन दिवसात बियाणे येईल, असे सांगितले जात असले तरी शेतकऱ्यांना बियाण्यांची प्रतीक्षाच करावी लागत आहे. (rabi season)

Rabi season : 

मारेगाव :  विधानसभा निवडणुकीमुळे शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी आडकाठी येत आहे. तालुक्यात दरवर्षी कृषी विभागातर्फे सुटीवरील बियाण्यांचे वितरण शेतकऱ्यांना केले जाते; परंतु सध्या निवडणूक आचारसंहितेचा कालावधी सुरु असल्याने अनुदानावरील बियाणे केव्हा मिळणार, याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.शेतकरी बियाण्यांसाठी कृषी विभागात चकरा मारीत असून विभागाच्यावतीने एक-दोन दिवसात बियाणे येईल, असे सांगितले जात असले तरी शेतकऱ्यांना बियाण्यांची प्रतीक्षाच करावी लागत आहे.

कृषी विभाग व आत्मा प्रकल्पातर्फे शेतकऱ्यांना अनुदानावर बियाण्यांचे वाटप केले जाते. मागील वर्षीसुद्धा ज्वारी, चणा व करडई बियाणे शेतकऱ्यांना पेरणीसाठी वितरित करण्यात आले होते.

आता यावर्षी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने अजूनपर्यंत बियाणे कृषी विभागाने उपलब्ध करून दिलेले नाही. सोयाबीन पिकाचीकाढणी झाली आहे. अशातच अनेक शेतकरी नांगरणी करून शेती मशागतीचे कामे पूर्ण झाली आहे.आचारसंहितेमुळे बियाणे उपलब्ध होणार की नाही, याबाबत कृषी विभागाचे अधिकारीसुद्धा अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. मागीलवर्षी कृषीविभागातर्फे शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर बियाणे वाटप करण्यात आले होते. यामध्ये चना बियाण्यांचाही समावेश होता. त्यामुळे तालुक्यात चना लागवडीखालील क्षेत्र वाढले होते. तालुक्यात मागील हंगामात दोन हजार हेक्टरवर चणा पेरा होता.

प्रात्यक्षिकासाठी मोफत बियाणेकृषी विभागामार्फत पीक प्रात्यक्षिकासाठी शेतकऱ्यांना मोफत बियाणांचे वाटप केले जाते. मागील वर्षी तूर, ज्वारीसह करडई बियाण्यांचे वाटप मोफत करण्यात आले होते. याचा लाभ बहुतांश शेतकऱ्यांनी घेतला होता.तालुक्यात १७ ते २० ऑक्टोबर आलेल्या परतीच्या पावसामुळे जमिनीत अधिकचा ओलावा निर्माण झाला. त्यामुळे रब्बी पेरणीचा हंगाम लांबला. हंगाम लांबल्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध होण्यासाठी अधिकचा कालावधी मिळणार आहे. असे असले तरी केव्हा बियाणे उपलब्ध होणार, याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रहरभरारब्बीसरकारी योजनापीकशेतकरीशेती