Maharashtra Rabi Season Seed Availability : येणाऱ्या काही दिवसांत मान्सूनच्या परतीच्या पावसाला सुरूवात होणार असून शेतकऱ्यांची खरिपातील सोयाबीन, उडीद, मूग, बाजरी ही पिके काढणीला आली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी करून ज्वारी पेरण्यास सुरूवातही केली आहे. रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा आणि मका ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. कृषी आयुक्तालयाच्या माहितीनुसार यंदाच्या रब्बी हंगामात गरजेपेक्षा जास्त बियाणे उपलब्ध आहे.
दरम्यान, रब्बी हंगामातील पेरण्या काही शेतकऱ्यांनी सुरू केल्या असून राज्यभरातील रब्बी कांद्याचे क्षेत्र वगळून ६१ लाख १७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या होणे अपेक्षित आहे. या पेरण्यांसाठी १० लाख ४१ हजार क्विंटल बियाणांची आवश्यकता आहे. तर रब्बी हंगामासाठी राज्यात गरजेपेक्षा जास्त म्हणजे १२ लाख ४८ हजार क्विंटल बियाणांची उपलब्धता असल्याची माहिती कृषी आयुक्तालयाने दिली आहे.
राज्यात रब्बी हंगामात बीज पुरवठा करण्यासाठी महाबीज, राष्ट्रीय बीज निगम या राष्ट्रीयकृत तर अनेक खासगी कंपन्या सामाविष्ट असतात. तर महाबीज कडून २ लाख ८३ हजार क्विंटल बियाणे, राष्ट्रीय बीज निगम कडून २९ हजार क्विंटल बियाणे आणि खासगी कंपन्यांकडून ९ लाख ९ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध केले जाणार आहे. महाबीजकडून मका, तर राष्ट्रीय बीज निगमकडून करडई या पिकांचे बियाणे उपलब्ध होणार नसल्याची माहिती आहे.
कोणत्या पिकासाठी किती बियाणे उपलब्ध?
- रब्बी ज्वारी - ७३ हजार ६३४ क्विंटल
- गहू - ५ लाख ५३ हजार क्विंटल
- मका - ५८ हजार क्विंटल
- हरभरा - ५ लाख ५६ हजार क्विंटल
- करडई - ३ हजार ७५२ क्विंटल
- एकूण - १२ लाख ४८ हजार क्विंटल