Join us

Rabi Sowing : गहू, ज्वारी, मका अन् हरभरा! राज्यात आत्तापर्यंत किती झाल्या रब्बीच्या पेरण्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 9:52 PM

यंदा मान्सूनचा पाऊस चांगला झाल्याने रब्बीच्या हंगामात जास्त कमतरता भासणार नाही अशी शक्यता आहे. 

Pune : राज्यातील रब्बीच्या पेरण्यांना वेग आला असून राज्यातील जवळपास ३० टक्क्यांहून अधिक पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती कृषी आयुक्तालयाकडून मिळाली आहे. मान्सूनचा पाऊस चांगला पडल्याने आणि परतीच्या पावसानेही राज्यात हजेरी लावल्यामुळे रब्बीच्या पिकांना फायदा झाला आहे. अद्यापही राज्यातील बहुतांश भागातील पेरण्या बाकी आहेत. 

दरम्यान, ज्वारी, हरभरा आणि गहू ही राज्यातील रब्बी हंगामातील प्रमुख पिके असली तरी मका, इतर कडधान्ये, करडई, तीळ, सुर्यफूल, जवस या पिकांचीही पेरणी केली जाते. आत्तापर्यंत रब्बी ज्वारी, मका आणि गहू या पिकांची पेरणी ९ लाख ९७ हजार हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. तर ज्वारी पिकाची पेरणी ही ७ लाख ८७ हजार हेक्टरवर झाली आहे. 

रब्बी हंगामात यंदा ५३ लाख ९६ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीखाली येण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंतची त्यातील १७ लाख २८ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मागच्या वर्षी याचवेळेत १४ लाख ८४ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदाची पेरणी ही यंदाच्या सरासरी क्षेत्राच्या ३२ टक्के एवढी झाली आहे. 

अजून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सोयाबीनची काढणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे ज्वारी आणि हरभऱ्याच्या पेरण्या बाकी आहेत. येणाऱ्या एका महिन्याच्या आतमध्ये जवळपास सर्वच क्षेत्रावर पेरण्या पूर्ण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पण यंदा मान्सूनचा पाऊस चांगला झाल्याने रब्बीच्या हंगामात जास्त कमतरता भासणार नाही अशी शक्यता आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रपेरणीलागवड, मशागत