परतीच्या पावसाने ओढ दिल्याने राज्यातील रब्बी पिकांची पेरणी झालेल्या क्षेत्रावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र आहे. दोन महिने उलटून गेले तरी राज्यात सरासरीच्या केवळ ३२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. रब्बीज्वारीची पेरणी गेल्या वर्षीइतकी झाली आहे. हरभऱ्याची लागवड मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ ७० टक्के इतकीच झाली आहे. ऊस तोडणीनंतर हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ होण्याची आशा कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
राज्यात यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना रडवणारा ठरला आहे. त्याची उणीव रब्बी हंगामात भरुन निघेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, परतीच्या पावसाने ओढ दिल्याने रब्बी हंगामाच्या आशेवर पाणी फिरले. त्यामुळे राज्यात रब्बीच्या पेरणी क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. राज्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र ५३ लाख ९६ हजार ९६९ हेक्टर इतके आहे. आतापर्यंत १७ लाख ४१ हजार ७९ हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे.
सरासरीच्या तुलनेत हे क्षेत्र ३२.२६ टक्के इतके आहे. गेल्या वर्षी राज्यात २२ लाख ४३ हजार ९०७ हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी झाली होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा झालेली पेरणी सुमारे ७८ टक्के इतकी आहे. राज्यात आतापर्यंत ८ लाख २० हजार हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत हे क्षेत्र केवळ ४६.७७ टक्के इतके आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे क्षेत्र ९७ टक्के इतके होते. गेल्या वर्षी राज्यात ८ लाख ४७ हजार ६११ हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली होती.
पाऊस नसल्याने राज्यातील गव्हाच्या पेरणीवर मोठा परिणाम झाला आहे. राज्यात आतापर्यंत केवळ ८७ हजार २१६ हेक्टरवरच गव्हाची पेरणी झाली असून, सरासरीच्या तुलनेत हे क्षेत्र केवळ ८.३२ टक्के इतकेच आहे. गेल्या वर्षी हेच क्षेत्र १ लाख ९८ हजार ४३७ हेक्टर इतके होते. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा केवळ ४४ टक्के क्षेत्रावरच गव्हाची पेरणी होऊ शकली आहे. रब्बी हंगामातील हरभरा हे महत्त्वाचे पीक असून, राज्यात आतापर्यंत ७ लाख २६ हजार ८२ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली असून, सरासरीच्या तुलनेत हे क्षेत्र ३३.७४ टक्के इतके आहे. गेल्या वर्षी १० लाख ४३ हजार ७९६ हेक्टरवर हरभरा लागवड झाली होती, गेल्या वर्षाची तुलना करता यंदा आतापर्यंत ७० टक्के क्षेत्रावर हरभऱ्याची लागवड झाली आहे. मक्याच्या लागवडीत घट झाल्याचे दिसून येत असून, आतापर्यंत केवळ ७९ हजार ३१२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी हेच क्षेत्र १ लाख ३ हजार १९२ हेक्टर इतके होते.
रब्बी हंगामातील प्रमुख तेलबिया पिकांपैकी करडईची पेरणी १५ हजार २६६ हेक्टरवर झाली आहे. गेल्या वर्षी हेच क्षेत्र १४ हजार ३६ हेक्टर इतके होते. नाशिक विभागात केवळ १८ हजार ७५७ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. केवळ १८ हजार ७५७ हेक्टर अर्थात सरासरीच्या तुलनेत केवळ ३.६९ टक्के इतकी झाली आहे.
विभागनिहाय पेरणी
विभाग | क्षेत्र | टक्के |
कोकण | ४,५७७ | १३.८३ |
नाशिक | ८,७५७ | ३.६९ |
पुणे | ५,३५,५४० | ४६,६० |
कोल्हापूर | १,९३,८४२ | ४५.४९ |
छत्रपती संभाजीनगर | २,४९,२९६ | ३३.६३ |
लातूर | ५,२८,२७२ | ३८.७३ |
अमरावती | १,४१,८६२ | १९.०१ |
नागपूर | ६८,९३३ | १६.०७ |
राज्य | १७,४१,०१९ | ३२.२६ |
- पुणे विभागात सर्वाधिक ५ लाख ३५ हजार ५४० हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी झाली. सरासरी प्रमाण ४६.६० टक्के आहे.
- लातूर विभागात ५ लाख २८ हजार २७२ हेक्टर अर्थात सरासरीच्या ३८.७३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
- राज्यात सर्वांत कमी पेरा नाशिक विभागात केवळ १८ हजार ७५७ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत रब्बी ज्वारीचे क्षेत्र जवळजवळ ९७ टक्के इतके झाले आहे. त्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. तर उसाच्या तोडणीनंतर हरभऱ्याच्या लागवडीत देखील डिसेंबर अखेरपर्यंत वाढ होण्याची अपेक्षा आहे. - दिलीप झेंडे, संचालक, विस्तार व प्रशिक्षण, कृषी विभाग, पुणे