Join us

भाताबरोबर नाचणी लागवडीला येतोय वेग; कशी केली जाते लागवड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2024 9:53 AM

नाचणीचे क्षेत्र निम्यापेक्षा कमी झाले आहे. याकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. भोर तालुक्याचा पश्चिम भाग दुर्गम डोंगरी असून मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि डोंगर उताराने पावसाचे पडलेले पाणी वाहून जाते.

भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील हिरडोशी खोऱ्यात पडलेल्या पावसामुळे भाताबरोबरचनाचणी लागवडीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. नाचणीचे क्षेत्र निम्यापेक्षा कमी झाले आहे. याकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. भोर तालुक्याचा पश्चिम भाग दुर्गम डोंगरी असून मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि डोंगर उताराने पावसाचे पडलेले पाणी वाहून जाते.

त्यामुळे डोंगर उतारावर नाचणीची लागवड केली जाते. भोर तालुक्यात भात हे प्रमुख पीक असून सुमारे ७ हजार ४०० हेक्टरवर भाताची लागवड होते. त्याखालोखाल डोंगरउतारावर नाचणीची सुमारे १२८५ हेक्टरवर लागवड केली जाते. त्यासाठी ६५ हेक्टरवर रोपवाटिका टाकली आहे.

प्रामुख्याने नीरा देवघर धरण भागातील हिरडोशी भागातील रिंगरोड आणि भोर-महाड रोडवरील गावात तर भाटघर धरण खोऱ्यातील वेळवंड आणि भुतोंडे विभागातील डोंगरी गावात नाचणीची लागवड केली जाते.

नाचणीच्या लागवडीसाठी मार्च, एप्रिल महिन्यात डोंगरउतारावरील जमिनीतील जाळीजळी झाडेझडपे तोडून ती जाळून जमिनीची नांगरणी करून जमीन तयार करून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात धूळवाफेवरच नाचणीचे बी पेरून त्याची उगवण झाल्याने पावसाळ्यात जूनचा शेवटचा आठवडा किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नाचणी पिकाची लागवड शेतकरी करतात.

यंदा जून संपत आला तरी दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे नाचणीसह भाताची लागवड रखडली आहे. पडलेल्या पावसाच्या जोरावर हिडोंशी खोऱ्यात नाचणी लागवड करण्यास सुरुवात केली आहे. नाचणीची लागवड करताना मजुरांचा खर्च, जाणारा वेळ हा डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखे आहे.

लागवडी दरम्यान, जमिनीची होणारी धूप, नांगरणीसाठी झाडे झुडपे तोडून जाळली जातात. त्यामुळे काही वेळा पशुपक्ष्यांची घरटी जळतात अथवा नुकसान होते. यामुळे शेतकरी नाचणी पीक घेण्याचे टाळतो. पूर्वी तालुक्यात सुमारे २ हजार ९०० हेक्टरवर नाचणीची लागवड केली जात होती. मात्र मागील दहा वर्षात नाचणी पिकाखालील क्षेत्र १६०० हेक्टरने कमी झाले आहे. सध्या १२८५ हेक्टरवरच नाचणी घेतली जाते.

नाचणी हे औषधी पीकनाचणी हे औषधी पीक आहे. त्याचबरोबर नाचणीची भाकरी, खीर, वड्या, पापड, नाचणी सत्त्व असे विविध प्रकार अधिक किमतीला शहरात विकले जातात. मात्र याची कल्पना शेतकऱ्यांना नाही. कृषी विभागाने नाचणी पिकाचे महत्त्व सांगण्याबरोबरच पीक वाढीसाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसत असल्याचे दीपक धामुणसे यांनी सांगितले.

टॅग्स :नाचणीभातशेतकरीशेतीपीकपीक व्यवस्थापनभोर