राहुरी : कृषी विद्यापीठात जास्तीत जास्त बियाणे उत्पादन करून ते शेतकरी, खासगी बीजोत्पादक कंपन्या यांना विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
राहुरी विद्यापीठातखरीप आढावा व रब्बी नियोजन बैठक कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत कुलगुरू पाटील यांनी ही माहिती दिली. बैठकीत विद्यापीठातील सर्व संशोधन केंद्रांतील खरीप बीजोत्पादन पिकांचा आढावा घेण्यात आला.
तसेच रब्बी हंगामातील कांदा, गहू, हरभरा व करडई या बीजोत्पादन पिकांचे मूलभूत, प्रमाणित, सत्यप्रत आदी वाणाचे उत्पादन कोणत्या ठिकाणी व किती क्षेत्रावर घ्यायचे, याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, डॉ. विठ्ठल शिर्के, डॉ. गोरक्ष ससाणे, डॉ. सातप्पा खरबडे, डॉ. विजय शेलार उपस्थित होते.
महाराष्ट्रातील वाढत्या डाळींब पिकाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना चांगल्या गुणवत्तेची, दर्जाची कलम रोपे विद्यापीठाने तयार करण्यासाठी टिश्यूकल्चर आधारित रोपांची निर्मिती करण्याकडे प्राधान्याने तयारी करावी, अशी सूचना कुलगुरू पाटील यांनी केली.
'महाबीज'चे जिल्हा व्यवस्थापक दौंड व सौरदीप बोस यांनी बीजोत्पादनविषयक चर्चेत सहभाग घेतला. बैठकीचे सादरीकरण प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नितीन दानवले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. ज्ञानेश्वर क्षीरसागर यांनी केले