Join us

Rain alert : पावसाचा अंदाज; सोयाबीन सुडी झाकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 5:18 PM

वाशिम जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (Rain alert)

Rain alert :

वाशिमः  परतीच्या पावसाने जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानाचे पंचनामे अद्याप झाले नाहीत. अशातच जिल्ह्यात पुढील चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

त्यात आज बुधवार आणि उद्या गुरुवारी बहुतांश भागांत पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरली आहे.यंदा जिल्ह्यात परतीच्या पावसाने जणू ठाणच मांडले होते. सप्टेंबरच्या अखेर पाच दिवस पावसाने धडाकाच लावला होता.

या पावसाचा काढणीवर आलेल्या सोयाबीनला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. या पावसामुळे मालेगाव तालुक्यात जवळपास ४१ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. अद्याप या पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले नाही. त्यातच पुढील चार दिवस पाऊस पडण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, जिल्ह्यात बुधवार आणि गुरुवारी बहुतांश भागांत अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरल्यास काढणीवर आलेल्या सोयाबीन पिकाचे पुन्हा नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत पुन्हा चिंतेचे भाव पसरले आहेत.

तीन दिवस येलो अलर्ट

* जिल्ह्यात पुढील चार दिवसांपैकी बुधवार आणि गुरुवारी बहुतांश भागांत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असतानाच तीन दिवसांसाठी जिल्ह्यात येलो अलर्टही जारी केला आहे.* आज पासून ते शुक्रवारदरम्यान जिल्ह्यात काही भागांत वादळीवाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मंगळवारी अनेक भागांत पावसाची हजेरी

जिल्ह्यात पुढील चार दिवस अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असतानाच मंगळवारी जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतात कापणी करून ठेवलेले सोयाबीन गोळा करण्यासह लावलेल्या सुड्या झाकण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानपाऊसअकोलासोयाबीनशेतकरीशेतीवाशिम