पुणे जिल्ह्यातील ५४ महसूल मंडळांमध्ये पावसाचा खंड जवळपास २२ ते तब्बल ३५ दिवसांचा झाला आहे. त्यामुळे खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे पीकविमा योजनेच्या निकषांनुसार पावसात २१ दिवसांपेक्षा जास्त घट असल्यास व उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट आल्यास शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईपैकी २५ टक्के आगाऊ रक्कम देण्यात येणार आहे. त्यासाठी कृषी विभाग व विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना या गावांमध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
खरीप पीकविमा योजनेच्या निकषांनुसार पावसाचा खंड २१ दिवसांपेक्षा जास्त असल्यास अशा क्षेत्रातील शेतकन्यांना त्यांच्या एकूण उत्पादनात ५० टक्के जास्त घट असल्यास त्यांना मिळणाऱ्या पीकविमा नुकसानभरपाईच्या २५ टक्के नुकसानभरपाई रक्कम आगाऊ दिली जाते. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या पीकविमा समितीची बैठक नुकतीच झाली. त्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे पीकविमा कंपन्यांचे प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी काढणार अधिसूचना
या बैठकीत जिल्ह्यातील ५४ मंडळांमध्ये पिकांचे सर्वेक्षण सुरु करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यावेळी दिले. हे सर्वेक्षण करताना पीकविम्यासाठी नोंद झालेल्या १४ पिकांसाठीच हे सर्वेक्षण केले जाणार आहे. एका महसूल मंडळातील ठरावीक पीक क्षेत्राची तपासणी ढोबळमानाने केली जाणार आहे. त्यावरून उत्पादनात नेमकी किती घट झाली आहे. हे निश्चित केले जाईल. तसा अहवाल विमा प्रतिनिधींच्या उपस्थितीत करून तो जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी त्यानुसार नुकसानभरपाईसाठीची अधिसूचना जारी करतील. त्यानंतर एकूण नुकसानभरपाईच्या २५ टक्के आगाऊ रक्कम शेतकयांच्या खात्यावर थेट जमा केली जाणार आहे.
म्हणून झाली परिस्थिती बिकट
जिल्ह्याचा सरासरी पाऊस: ६८४ मिमी
आतापर्यंत झालेला पाऊस: ४५५ मिमी
सरासरीच्या तुलनेत झालेला पाऊस: ६७%
सर्वांत कमी पाऊस झालेला तालुका पुरंदर: ३८%
हवेली तालुक्यातील सरासरी पाऊस: ३९%
बारामतीतील सरासरी पाऊस: ४०%
इंदापूर, दौंड, शिरूरमध्येही सरासरी पाऊस कमीच असून, पावसाचा खंड एक महिन्यापेक्षा अधिक झाला आहे.
जिल्ह्यातील ७७ मंडळांमध्येही ८० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस आहे. येथेही येत्या काही दिवसांत पाऊस न पडल्यास पिकांची स्थिती बिकट होईल. - संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे