Join us

अवकाळी, पाण्याच्या कमतरतेमुळे द्राक्ष बागायतदारांवर संकट! जाणून घ्या बागांची सद्यस्थिती

By दत्ता लवांडे | Published: November 09, 2023 1:24 PM

यंदा साधारण उत्पादन चांगले होण्याची स्थिती असली तरी पावसाची कमतरता आणि वातावरणातील बदलामुळे द्राक्षे उत्पादक शेतकरी अडचणीत सापडू शकतात.

पुणे : भारतातील द्राक्षाला जगभरात मागणी असून मोठ्या प्रमाणावर द्राक्षे भारतातून दरवर्षी निर्यात होत असतात. शेतकरी यंदाच्या हंगामाच्या तयारीला लागले आहेत. ऑगस्ट ते नोव्हेंबर या चार महिन्यात द्राक्षांची छाटणी होत असते. तर जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात मालाची हार्वेस्टिंग होत असते. पण यंदा साधारण उत्पादन चांगले होण्याची स्थिती असली तरी पावसाची कमतरता आणि वातावरणातील बदलामुळे द्राक्षे उत्पादक शेतकरी अडचणीत सापडू शकतात.

द्राक्षबागांची काय आहे सद्यपरिस्थिती

सध्या काही बागांची छाटणी पूर्ण झाली असून शेवटच्या टप्प्यात राहिलेल्या छाटणीच्या कामाला वेग आला आहे. पण अजूनही १०० टक्के छाटणी पूर्ण झालेली नाही. तर जून जुलैमध्ये छाटणी केलेल्या काही शेतकऱ्यांच्या द्राक्षाचे हार्वेस्टिंग सध्या सुरू आहे. हार्वेस्टिंग सुरू असलेले क्षेत्र तुलनेने कमी आहे. छाटणीबरोबरच भेसळडोस, पाणी आणि खताचं नियोजन बागांसाठी केलं जात आहे. छाटणी केलेल्या बागांतील द्राक्षाच्या घडाचे मणी मोठे व्हायला सुरूवात झाली आहे. पण यंदा पाण्याची कमतरता भासणार असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

काय आहे द्राक्ष बागांसाठी संभाव्य संकट?

महाराष्ट्रात सांगली, सोलापूर, पुणे, नाशिक या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर द्राक्षाचं पीक घेतलं जातं. यंदा राज्यातील सरासरी पावसात लक्षणीय घट झाल्यामुळे द्राक्षाच्या काढणीच्या काळात पाण्याचं संकट उद्भवू शकते.  त्यातच सांगली, सोलापूर भागात मान्सूच्या परतीचा पाऊस कमी झाल्यामुळे या भागात पाण्याचं टेन्शन जास्त असणार आहे. काही बागांमधील छाटण्या अजूनही पूर्ण झालेल्या नसल्यामुळे नियोजन लागलेले नाही. 

बागांची छाटणी केल्यानंतर द्राक्षांच्या फुलांचा कालावधी १० ते १२ दिवसांचा असतो. पण या काळात पाऊस पडला तर फुलांमध्ये पाणी जाते आणि परिणामी फुल कुजते. त्यामुळे घड तयार होत नाहीत. या कालावधीमध्ये पडलेला पाऊस द्राक्ष उत्पादकांसाठी घातक आहे. 

दिवाळीच्या चार दिवस अगोदर पडलेल्या पावसामुळेही काढणीला आलेल्या द्राक्ष बागांचे नुकसान होणार आहे. वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे रोग वाढतात, परिणामी शेतकऱ्यांना रोग नियंत्रणासाठी फवारण्या कराव्या लागतात. त्यामुळे उत्पादन खर्चामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, नाशिक, फलटण परिसरातील काही शेतकरी धाडस करून बाजारात आपला माल लवकर यावा आणि दर जास्त मिळावा यासाठी सीझनच्या अगोदर म्हणजे जून जुलैमध्ये बागांची छाटणी करतात. या शेतकऱ्यांची संख्या तुलनेने कमी असली तरी त्या शेतकऱ्यांचा माल आता काढणीला आला आहे. ही काढणी सुरू असताना पाऊस आला तर द्राक्षाला तडे जाऊन हंगाम वाया जाऊ शकतो. 

भेसळयुक्त खतांची भिती

सध्या द्राक्षे बागा बहरण्याचा कालावधी असून शेतकऱ्यांकडून त्यासाठी खते, पाणी, औषधे, फवारण्यांचे नियोजन केले जात असते. त्यातच पुण्यातील इंदापूर तालुक्यातील बोरी येथे एका खासगी कंपनीकडून भेसळयुक्त खते दिल्यामुळे जवळपास २०० एकर द्राक्षे बागा उध्वस्त झाल्याचा दावा शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. पोटॅशयुक्त खतामध्ये तणनाशक आढळून आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भेसळयुक्त खतांची सर्वांत मोठी भिती शेतकऱ्यांना आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रद्राक्षेशेतकरीपुणेइंदापूरनाशिक