नांदेड जिल्ह्यात अल्प पावसावर धोका पत्करत तीन लाख हेक्टरवर पेरणी केलेली पिके ऊन धरू लागली आहेत. पावसाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करूनही वरूण राजाला पाझर फुटत नसल्याने बळीराजाची फसगत झाली आहे.
यावर्षीच्या पावसाळी हंगामात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. या शक्यतेवर भरोसा ठेवून शेतकऱ्यांनी महागामोलाची बियाणे खरेदी केली. पेरणीची जय्यत तयारीही केली, पण पावसाने पाठ दाखविली. मृग नक्षत्र अक्षरश: कोरडे गेले. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक पाऊस झाला असला तरी पेरणीयोग्य पाऊस अजून झाला नाही.
मात्र काही शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या अंदाजावर भरोसा ठेवून पेरणीचा धोका पत्करला आणि या शेतकऱ्यांची आता फसगत झाल्याची भावना निर्माण झाली आहे. पेरलेले बियाणे अनेक भागात अंकुरले आहेत. पाऊस मात्र गायब झाला असून दररोज उन्हाळ्याप्रमाणे चटके देणारे ऊन पडत आहे.
कोवळ्या पिकांना हे ऊन सहन होत नसून पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करीत आहेत. सध्या तरी समाधानकारक पाऊस होत नसल्याने नांदेड जिल्हाभरातील पिके सद्यस्थितीला सलाईनवर असून पावसाची नितांत आवश्यकता आहे.
दुबार पेरणी अन् दुबार खर्च; उत्पन्न एकदाच
● समाधानकारक पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. पहिल्या पेरणीला जेवढा खर्च केला तेवढाच खर्च दुसऱ्या पेरणीलाही येणार आहे.
● पैशांची अडचण, पीक कर्जासाठी धावपळ करून कशीबशी एकदा पेरणी केली. आता पुन्हा दुसऱ्यांदा तीच कसरत शेतकयांना करावी लागणार आहे. पेरणीवर दोनदा खर्च केल्यानंतर उत्पादन मात्र एकदाच मिळेल. त्याचा भावही सारखाच राहणार आहे. अशावेळी खर्च अधिक अन् उत्पन्न कमी अशा कात्रीत शेतकरी सापडले आहेत.
कोणत्या पिकाची किती पेरणी (हे. मध्ये)
सोयाबीन १५४०४५कापूस २०५३४४तूर २२८५२मूग ४७५१ज्वारी ३०६५
जिल्ह्यात २९ जूनपर्यंत १५० मि.मी. पाऊस होणे अपेक्षित आहे. त्या तुलनेत १३३ मि.मी. पाऊस झाला आहे.
३८ टक्के जिल्ह्यात पेरणी
• खरिपाचे जिल्ह्यात ७ लाख ६६ हजार ८०९ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी २ लाख ९४ हजार ७५० हेक्टरवर पेरणी झाली आहे.
• प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत ३८ टक्के पेरणी झाली असून ही पिके धोक्यात आहेत. विशेष म्हणजे कापूस आणि सोयाबीन दोन्ही पिकांची ४४ टक्के पेरणी झाली आहे.