यंदा पावसाने ओढ दिल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात मोसंबी बागा धोक्यात आल्या आहेत. ऐन फुलोऱ्याच्या काळात पावसाच्या खंडाने खरिपातील पिकेही हातातून गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
पैठण तालुक्यात अनेक शेतकरीकापूस, मक्यासह मोसंबीचीही लागवड करतात. जायकवाडी धरणक्षेत्राला लागून जरी हा तालुका असला तरी यंदा पाऊस न झाल्याने अनेकांची पिके धोक्यात आली आहेत. परिणामी, मोसंबी व इतर फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
"कापसाला पाणी द्यावं की मोसंबीला हेच कळेना.." हे सांगताना पैठण तालुक्यातील शेतकरी शाखिर जखीर शेख हतबल झाले होते. "कापूस तर हातातून गेलाच आहे. कैऱ्याही लागल्या नाहीत. अर्ध्याहून अधिक मोसंबी गळून गेली आहे. पाऊस चांगला झाला असता तर जवळपास ४ लाखांचे उत्पन्न मिळाले असते. यंदा पाऊस नाही. त्यामुळे उत्पन्न लाख दीड लाखांवर आले आहे."
शाखीर शेख यांची पैठण तालुक्यात सुमारे १० एकर जमीन आहे. त्यात ३-४ एकरात त्यांनी यंदा मोसंबीची लागवड केली होती. वातावरण बदल आणि पावसाच्या खंडामुळे मोसंबीवर मगरी रोग पडला. त्यामुळे व्यापाऱ्यांनी मोसंबी घेण्यास नकार दिला. १.५ ते २ टन मोसंबी गळून गेली. राहिलेली मोसंबीचा आकार लहान असल्याने ती ही कमी दराने विकावी लागल्याचे ते म्हणाले.
'आमच्या गावातील जवळपास ५ हजार शेतकऱ्यांची अशीच अवस्था आहे. आमची १५ टन मोसंबी झाली. १४ रुपये प्रति किलोच्या दराने विक्री करावी लागली. पाऊस आला असता तर २५ ते ३० हजार क्विंटलने विक्री झाली असती.
या आठवड्यातला पाऊस सोडला तर तालुक्यात दीड महिन्याचा खंड होता. परिणामी, पिकांना मोठा फटका बसला आहे. बहुतांश झाडाच्या मोसंबी गळून पडल्याचे शेतकरी सांगत आहेत. विहिरी बोरवेलच्या पाण्याने तळ गाठला आहे. पैठणमधील अनेक मोसंबी फळबागा सुकू लागला आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान अटळ असल्याचे चित्र आहे.