राज्यभर पाऊस पडत असताना मराठवाडा मात्र तहानलेला होता. परंतू गेले चार दिवस खान्देश आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढला असून, रविवारी अतिवृष्टी झाली. हातातोंडाशी आलेले पिक पाण्यात वाहून जाण्याची परिस्थिती झाली आहे.
अनेक नद्यांना पूर आला, तर शेतातील उभी पिके आडवी झाली. नाशिक परिसरातही पावसाचा जोर असून, गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहेत, तर जायकवाडी धरण भरले आहे.
पैनगंगेला आलेल्या पुरामुळे विदर्भ, मराठवाड्याचा संपर्क तुटला आहे. विदर्भातही पावसाचा जोर वाढला असून, वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात नद्यांना पूर आला आहे.
तीन जिल्ह्यांत १६ प्रकल्पांचे १७८ गेट उघडले
नांदेड, परभणी व हिंगोली या तीन जिल्ह्यांतील १६ प्रकल्पांचे तब्बल १७८. गेट उघडण्यात आले आहेत, परभणी जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणाचे १४ गेट उघडण्यात आले आहेत.
पैनगंगा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे मराठवाड्याचा विदर्भाशी संपर्क तुटला होता. धाराशिव जिल्ह्यात १४ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली.
हिंगोली : जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाला. २४ तासांमध्ये तब्बल १४२ मिलिमीटर पाऊस झाला अनेक प्रकल्प तुडुंब शेतशिवार जलमय.
चंद्रपूर: राजुरा, बल्लारपूर तालुक्यांतून जाणाऱ्या वर्धा नदीला पूर आल्याने नदीकाठावरील शेतशिवार जलमय झाले.
अकोला: काटेपूर्णा व वान या दोन्ही मोठ्या प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग.
यवतमाळ : जिल्ह्याला दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाचा तडाखा, वणी, मारेगाव तालुक्यांत वाहतूक ठप्प, नदीकाठच्या कुटुंबांचे स्थलांतर वाशिम जिल्ह्यातील अनेक प्रकल्प तुटुंब, विसर्गामुळे पूर आल्याने वाहतूक विस्कळीत.
बुलढाणा : संग्रामपूर तालुक्यातील कोलद, वहगाव वान, रिंगणवाडी, मोमीनाबाद, आदी गावांचा संपर्क तुटला होता.
सोलापूर : रविवारी पहाटे सुरू झालेली पावसाची संततधार रात्रभर, तसेच सोमवारी दिवसभर सुरू होती.
जालना: २९ महसूल मंडळांत अतिवृष्टी: नद्यांना पूर, प्रकल्पांत पाणीसाठ्यात वाढ, वाहतूक ठप्प झाली होती.
लातूर: रविवारी रात्री जिल्ह्यातील दहापैकी सहा तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर: खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी येथे दुचाकीवर दवाखान्यात जाणारे दोन युवक धांड नदीच्या पाण्यात वाहून जाताना ग्रामस्थांनी त्यांना वाचविले. ममुराबाद येथे ही घटना घडली.
पावसाने 'बोनस' पिकांची लावली वाट
खेडगाव, (ता. भडगाव): खरिपातील कापूस या मुख्य पिकात आंतरपीक म्हणून घेतली जाणारी मूग, उडीद, तूर, तीळ, काकडी आदी पिके हातातोंडाशी आलेली असताना सततच्या पावसाने वाया गेली आहेत. मुख्य खरीप पीक निघेपर्यंत या बोनस पिकांतून शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागत असतो.
वाघूर नदीला पूर, घरे गेली वाहून पहूर, ता. जामनेर (जि. जळगाव):
वाघूर नदीला मोठा पूर आला. यामुळे हिंवरी दिगर गावातील नदीकाठची ५ घरे वाहून गेली. यात एका मजुराचे पेटीत ठेवलेले पावणेदोन लाख रुपयेही इतर वस्तूंसोबत पाण्यात गेले.
६१ महसूल मंडळांत अतिवृष्टी
बीड जिल्ह्यात ६१ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे, तसेच दिवसभरात झालेल्या संततधारेमुळे ११ ठिकाणी घरांची पडझाड झाली, तर दोन ठिकाणी दोन जनावरे मयत झाली. अनेक भागांत सोमवारी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.