पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे अनेक आजारांमध्ये वाढ होते. त्यामुळे पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्त्ती वाढविण्यासाठी किवी, ड्रॅगन फ्रूट खाण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ञ देतात.
लहान मुलांना ही फळे प्रचंड आवडतात. त्यामुळे आजारपणात औषधी घेत नसल्यास मुलांना ही फळे खाऊ घालण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ञ देतात. त्यासोबतच ड्रॅगन फ्रूट फळाचा हंगाम देखील पावसाळा असल्याने या दिवसांत या फळाची बाजारात चलती दिसून येते.
ड्रॅगन फ्रूट १५० ते २०० रुपये किलो
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात सध्या ड्रॅगन फ्रूट १५० ते २०० रुपये किलो मिळत आहे. पावसाळ्यात या फळांना मागणी असते त्यामुळे भावात वाढ होते. तर या फळाची लागवड जिल्ह्यात मोजकेच शेतकरी करीत असून, परजिल्ह्यातून आयात करण्यात येते.
किवीही महाग
किवी फळांचे दरही सध्या महाग झाले आहेत. १३० रुपयांना केवळ तीन किवीची फळे मिळत आहेत. शहरातील बसस्थानक परिसर तसेच अग्रसेन चौकातच ही फळे मिळतात. अन्य ठिकाणी असलेल्या फळविक्रेत्यांकडे ही फळे मिळत नाहीत.
पपई ४० रुपयांवर
गत काही दिवसांपासून पपईच्या दरातही वाढ झाली आहे. पपईचे दर ४० रुपये किलो झाले आहेत. जिल्ह्यात अनेक शेतकरी पपईची शेती करतात. भाववाढीमुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते म्हणून...
किवी : पावसाळ्यात डेंग्यू आजाराचे प्रमाण जास्त असते. अनेक रुग्ण आढळतात. डेंग्यू झाल्यावर शरीरातील प्लेटलेट कमी होतात. किवी फळाचे सेवन केल्यावर प्लेटलेट वाढतात. त्यामुळे अनेकजण हे फळ खातात.
ड्रॅगन फ्रूट : डेंग्यू झाल्यानंतर प्लेटलेट कमी झाल्या व त्यामध्ये लवकर वाढ झाली नाही तर मेंदूमध्ये रक्तस्त्राव होतो. ड्रॅगन फ्रूट खाल्ल्यावर प्लेटलेट लवकर वाढतात. त्यामुळे अनेक नागरिक डेंग्यू झालेल्या रुग्णांना ड्रॅगन फ्रूट देतात.
पपई : पपईच्या पानांचा रस खाल्ल्यानंतर प्लेटलेट वाढतात.
गत काही वर्षांमध्ये किवी व ड्रॅगन फ्रूट या दोन्ही फळांचे महत्त्व वाढले आहे. या फळांचे सेवन केल्यावर प्लेटलेट वाढतात, असा नागरिकांचा समज आहे. तो कुठून आला हे सांगता येणार नाही. या फळांचे सेवन केल्यावर खरोखरच प्लेटलेट वाढतात का यावर वैद्यकीय दृष्टिकोनातून संशोधन व्हायला हवे. त्या संशोधनानंतरच प्लेटलेट वाढतात काय हे समजेल. - डॉ. शैलेश खंडारे, आयुष वैद्यकीय अधिकारी, पिंपळगाव राजा.
हेही वाचा - Health Benefits Of Pomegranate डाळींबाचे सेवन विविध आजारांवर आहे गुणकारी