Join us

पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथील राजेंद्र मेहेरे यांना मच्छीमार म्हणून स्वातंत्र्य दिनासाठी दिल्लीला आमंत्रण

By बिभिषण बागल | Published: August 11, 2023 6:00 AM

नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर यावर्षीच्या स्वातंत्र्य दिन सोहोळ्यात  पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकवताना उपस्थित राहण्यासाठी तसेच त्यांनी देशवासियांना उद्देशून केलेले भाषण ...

नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर यावर्षीच्या स्वातंत्र्य दिन सोहोळ्यात पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकवताना उपस्थित राहण्यासाठी तसेच त्यांनी देशवासियांना उद्देशून केलेले भाषण ऐकण्यासाठी देशभरातील विशेष निमंत्रित त्यांच्या  जोडीदारासह आमंत्रित करण्यात आले असून त्यांच्या उपस्थितीत हा सोहोळा पार पडेल.

मत्स्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने महाराष्ट्र राज्यातील तीन मच्छीमारांची निवड केली असून हे मच्छीमार १५ ऑगस्ट २०२३ रोजी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याचे साक्षीदार बनण्यासाठी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. या ऐतिहासिक  स्थळी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्राला उद्देशून केलेले संबोधन ऐकण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या सुमारे १८०० व्यक्तींमध्ये पन्नास मच्छीमार आपल्या कुटुंबियांसह उपस्थित राहणार आहेत. सरकारच्या ‘जन भागीदारी’ या संकल्पनेनुसार देशभरातील सर्व स्तरातील लोकांना या सोहळ्यासाठी विशेष आमंत्रित म्हणून उत्सवात सहभागी करून घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

या उत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या ५० मच्छिमारांपैकी तीन मच्छीमार महाराष्ट्रातील आहेत. विशेष निमंत्रितांपैकी एक असलेले तुकाराम वानखेडे, जे मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील नेवपूरचे आहेत आणि गोड्या पाण्यात मासेमारी करतात, ते नवी दिल्लीतील स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी आमंत्रण मिळाल्याने अत्यानंदात आहेत. “माझ्यासारखा सामान्य माणूस विमानाने प्रवास करून दिल्लीला जाणार आणि विशेष आदरातिथ्याचा मानकरी ठरणार, माझ्यासाठी हा अत्यंत गौरवास्पद क्षण आहे", अशी प्रतिक्रिया तुकाराम वानखेडे यांनी व्यक्त केली आहे.  पंतप्रधानांसारखी महत्त्वाची व्यक्ती देशातील गरीबातील गरीब माणसापर्यंत कशी पोहोचते, यांचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे, असे सांगत त्यांनी आमंत्रण दिल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.

पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथील राजेंद्र शांताराम मेहेरे नावाच्या आणखी एका मच्छीमार बांधवाला या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले आहे. “सरकारने केंद्रात एक स्वतंत्र मत्स्यव्यवसाय मंत्रालय निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामुळे मच्छीमारांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होत आहेत, तसेच किसान क्रेडिट कार्डाचा मत्स्यपालन व्यवसायात विस्तारित वापर यासह मत्स्यसंवर्धन, विविध मत्स्य प्रजातींचे रक्षण, सागरी पर्यावरण आणि इतर गोष्टींचा मत्स्य व्यवसाय क्षेत्राला खूप फायदा झाला आहे " अशा शब्दात राजेंद्र मेहरे यांनी आपला आनंद व्यक्त केला. १५ ऑगस्ट रोजी दिल्लीत या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करताना मला खूप आनंद होत आहे.” असेही ते म्हणाले. 

टॅग्स :मच्छीमारस्वातंत्र्य दिननरेंद्र मोदीपंतप्रधानशेतकरी