Rajma Cultivation : धारशिव येथील कळंब तालुक्यात यंदा मस्सा खंडेश्वरी शिवारात दमदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे जलपातळी उंचावली आहे. मुबलक पाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील राजमा पिकाकडे कल वाढला आहे.
ज्वारी, गहू, हरभरा या पिकांपेक्षाही राजमा पिकाचे क्षेत्र अधिक आहे. कळंब तालुक्यातील मस्सा खंडेश्वरी परिसरात खरीप हंगाम संपल्यानंतर शेतकऱ्यांना रब्बी पेरणीचे वेध लागतात.
जमिनीची मशागत करून पाण्याचा उपलब्धतेनुसार शेतकरी गहू, हरभरा, ज्वारी यांसारख्या पिकांची निवड करून पेरणी करतात.
परंतु, पिकांना जेमतेम पाणी मिळावे, ज्यामुळे चांगले पीक काढले जाईल, असे प्रसंग शेतकऱ्यांच्या नशिबी क्वचितच. परिणामी, उत्पन्नात घट होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते.
कळंब तालुक्यातील मस्सा खं. शिवारातील शेतकऱ्यांच्या बाबतीतही असेच काहीसे चित्र दिसून येते. गावचा शिवार विस्ताराने खूप मोठा आहे. त्यानुसार खरीप आणि रब्बी हंगामातील पेरणीचे क्षेत्रही मोठे आहे. परंतु क्षेत्रफळानुसार पाण्याच्या उपलब्धतेचे प्रमाण खूपच
कमी आहे. दरवर्षी येथील शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते.
पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास पेरणीतील उत्पन्नात घट तर होतेच, त्याच बरोबर रब्बीच्या पेरणी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात घट होते. परिणामी, शेतीवर अवलंबून असणाऱ्या गरजा डोकेवर काढतात आणि शेती नुकसानकारक वाटू लागते.
यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पादनात बऱ्यापैकी वाढ झाली. परंतु सततच्या पावसामुळे नुकसानही तेवढेच झाले आहे. सोयाबीन बाजारपेठेत आल्यानंतर दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. परिणामी, शेतकरी रब्बी हंगामात राजमा पिकाकडे वळले आहेत. आता राजम्याला तरी शासनाने चांगला दर द्यावा. - महेश वरपे, शेतकरी, मस्सा खं.
राजमा पिकाची माहिती
राजमा हे कडधान्न्यात मोडणारे पीक आहे. राजमा पिकात पोषणतत्व तसेच कॅल्सियम मोठ्या प्रमाणात आहे. शरीराला फिटनेस ठेवण्याचे काम राजमा करते बऱ्याच राज्यामध्ये राजमा चावल, तसेच, राजमा उसळ, राजमा भाजी, प्रसिद्ध आहे. हे पीक भारतात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, बिहार, उत्तरप्रदेश या ठिकाणी शेती केली जाते.
आता राज्यातील काही शेतकऱ्यांनी रब्बीत राजमा पिकाला पंसती दिली. राजमा कमी कालावधीचे पीक असून एकरी उत्पादनही जास्त मिळते. तसेच राजम्याची खरेदी गावातच केली जात असल्याने त्याला प्रतिक्विंटल चांगला दर मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
भारतात मागील काही वर्षांपासून राजम्याचा विस्तार वाढतोय. भारताला दरवर्षी १ लाख ते १ लाख ५० हजार टन राजमा आयात करावा लागतो. देशात जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा आणि महाराष्ट्रात राजम्याची लागवड केली जाते.
महाराष्ट्रात दिवसेंदिवस रब्बी हंगामात राजम्याचे क्षेत्र वाढत आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये राजम्याचे क्षेत्र जास्त आहे. मात्र, आता मराठवाडा आणि विदर्भातही लागवड वाढत आहे.