बालाजी आडसूळ
उत्तर भारतातील 'रसोई' घरात मानाचे स्थान असलेल्या राजमा पिकाने मागच्या चार वर्षांपूर्वी मराठवाड्याच्या धाराशिव जिल्ह्यातील इटकूर, सारोळा, गंभीरवाडी भागात दमदार एन्ट्री केली होती. यंदा हेच नवे पीक रब्बी हंगामातील 'क्रॉप पॅटर्न' बदलाची नांदी ठरत असून एकट्या कळंब व वाशी तालुक्यात एकूण रब्बी क्षेत्रात राजम्याचा पेरा २५ हजार एकरांच्या पुढे पोहोचला आहे.
उत्तर भारतात वर्षातील काही महिने वातावरणात शीतलता असते. हा थंडावा शरीरात ऊर्जा निर्माण करण्याची गरज निर्माण करतो. यातूनच मग तेथील रसोई घरात राजमा रुजला गेला. उत्तरांचल, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, दिल्ली, चंदीगड अशा प्रांतात आहारात रुजलेला हा राजमा मागच्या चार वर्षांत कळंब तालुक्यातील इटकूर, वाशी तालुक्यातील वाशी, पारगाव महसूल मंडळात चांगलाच रुजला आहे.
यातही वाशी तालुक्यातील सारोळा मांडवा, सेलू व कळंब तालुक्यातील इटकूर, गंभीरवाडी, भोगजी, बहुला या गावांनी प्रथम राजमा पीक घेतले अन् यशस्वी करून दाखवले. आज येथील यशकथाच राजम्याचे इतर भागात क्षेत्र वृद्धिंगत करण्यास कारणीभूत ठरल्या आहेत.
गल्लीत चर्चा, दिल्लीत दबदबा...
यंदा तालुक्यात पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाला. यामुळे रब्बी हंगामासाठी बऱ्यापैकी पाणी उपलब्ध आहे. यामुळे रब्बी हंगामात शेतकरी खुशीत आहेत. यातही गावोगावी, गल्लोगल्ली राजम्याचीच चर्चा आहे. हा राजमा इटकूर, सारोळा मांडवा येथून दिल्ली मार्केटला जातो. तेथील मार्केटमध्ये या भागाचा चांगलाच दबदबा निर्माण झाला आहे.
राजमा रुजला, क्षेत्रात कैकपटींनी वाढ
● कळंब तालुक्यातील इटकूर, सारोळा आदी भागांतील शेतकऱ्यांना मागच्या तीन-चार वर्षात राजम्याने बऱ्यापैकी पैसा हाती दिला.
● याचीच परिणती तालुक्यातील हा बदलता 'क्रॉप पॅटर्न' लगतच्या केज, धाराशिव, लातूर, अंबाजोगाई, परळी, भूम, परंडा आदी तालुक्यात सरकला.
एकूण पेरा पन्नास टक्क्यांवर...
■ कळंब तालुक्यातील हरभरा पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र ५० हजार हेक्टरवर होते. यंदा यात मोठी घट दिसून येत आहे. राजमा पेर व नवीन ऊस लागवड यामुळे हरभरा क्षेत्रात घट दिसून येत आहे.
■ एकट्या इटकूर महसूल मंडळात एकूण रब्बी क्षेत्रात राजमा पन्नास टक्क्यांवर गेला आहे. तालुक्यातील इतर मंडळातही राजम्याचे क्षेत्र विक्रमी वाढले आहे.
■ तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे यांच्या माहितीनुसार कळंब तालुक्यात राजम्याचे ५ हजार हेक्टरवर क्षेत्र जाण्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सीड मार्केट, दररोज रांगा...
तालुक्यातील इटकूर, गंभीरवाडी लगतच्या वाशी तालुक्यातील सारोळा येथे राजम्याचे सीड मार्केट निर्माण झाले आहे. शंभर शंभर किलोमीटर अंतरावरून याठिकाणी राजमा बियाणे घेण्यासाठी शेतकरी येत होते. यात कंपन्यांचे पिशवीबंद बियाणे घेण्यापेक्षा शेतकरी, व्यापारी यांच्याकडून खात्रीशीर बियाणे घेण्याकडे नव्या शेतकऱ्यांचा कल दिसून येत होता.
असे आहे जिल्ह्यातील रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र
■ एकूण - ४,११,१७२ सर्वसाधारण क्षेत्र (हेक्टर)
ज्वारी | १,८१,४२७ |
हरभरा | १,८०,९६० |
गहू | २८,९७७ |
मका | ३,८३८ |
जिल्ह्यात लागवड झालेले राजमाचे लोकप्रिय वाण
वाण | उतारा (क्विंटल) | दर (क्विंटल) | कालावधी | पाणी नियोजन |
वरुण | ७ ते १२ | ५००० ते ७००० | ७५ ते ८० दिवस | ४ ते ६ पाळ्या |
वाघ्या | ६ ते ८ | ८००० ते १०,००० | ८० ते ९० दिवस | ४ ते ६ पाळ्या |
डायमंड | ५ ते ७ | १०,००० ते १४,००० | ९० ते १०० दिवस | ५ ते ७ पाळ्या |