सुनील चरपेनागपूर:महाराष्ट्रात जाड्या (हलक्या) धानाचे दर किमान आधारभूत किमती (एमएसपी) पेक्षा कमी आहेत. शेजारच्या तेलंगणा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये याच धानाचे दर 'एमएसपी'पेक्षा अधिक आहेत. राज्य सरकारने अद्यापही शासकीय धान खरेदी केंद्र सुरू न केल्याने शेतकऱ्यांना कमी दरात धानाची विक्री करावी लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तेलंगणामध्ये नेऊन धानाची विक्री करावी का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यात धानाचे सर्वाधिक राेवणी क्षेत्र विदर्भात असून, त्याखालाेखाल काेकणात आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्यात धानाचे क्षेत्र २२,८४७ हेक्टरने घटले असले तरी विदर्भात मात्र ७,३७५ हेक्टरने वाढले आहे. विदर्भात यावर्षी ८ लाख ४४ हजार ५६ हेक्टरमध्ये धानाची राेवणी करण्यात आली असून, यात किमान २२ ते २५ टक्के क्षेत्र जाड्या धानाचे आहे.
बारीक धानाच्या तुलनेत जाड्या धानाचा उत्पादन खर्च कमी असून, उत्पादन अधिक आहे. हा धान वजनी असताे. कमी पाणी किंवा सिंचनाची सुविधा नसलेल्या क्षेत्रातील शेतकरी जाड्या धानाचे अधिक उत्पादन घेतात. पूर्वी जाड्या व बारीक धानाच्या दरात प्रतिक्विंटल २०० ते ३५० रुपयांची तफावत असायची. सरकारला 'एमएसपी' दरात धान विकल्यास बाेनस मिळत असल्याने आर्थिक फायदा व्हायचा. त्यामुळे काही शेतकरी जाड्या धानाच्या उत्पादनाकडे वळले. मागील चार ते पाच वर्षांपासून या दाेन्ही धानाच्या दरात दीड ते दुपटीची तफावत निर्माण झाल्याने बारीक धान सरकारला विकला जात नाही.
धानाची 'एमएसपी'केंद्र सरकार दरवर्षी 'काॅमन' आणि 'ग्रेड-ए' या दाेन प्रकारच्या धानाची 'एमएसपी' जाहीर करते. जाड्या धानाचा समावेश 'काॅमन'मध्ये करण्यात आला असून, 'ग्रेड-ए'मध्ये बारीक म्हणजेच बिगर बासमती धानाचा समावेश हाेताे. सन २०२३-२४ या विपणन वर्षासाठी केंद्र सरकारने 'काॅमन' धानाची 'एमएसपी' प्रतिक्विंटल २,१८३ रुपये, तर 'ग्रेड-ए' धानाची 'एमएसपी' २,२०३ रुपये प्रतिक्विंटल जाहीर केली आहे.
जाड्या धानाचे दरराज्य - सरासरी दर (प्रतिक्विंटल)तेलंगणा - २,५०० रुपयेमध्य प्रदेश - २,३०० रुपयेछत्तीसगड - २,२०० रुपयेमहाराष्ट्र - १,८५० रुपये
एमएसपी व फायदा/नुकसान (रुपये/प्रति क्विंटल)तेलंगणा - ३१७ रुपये - फायदामध्य प्रदेश - ११७ रुपये - फायदाछत्तीसगड - १७ रुपये - फायदामहाराष्ट्र - ३३३ रुपये - नुकसान
तेलंगणातील शेतकऱ्यांना सर्वाधिक लाभतेलंगणामध्ये राज्य सरकार व व्यापारी प्रति क्विंटल २,५०० रुपये दराने जाडा धान खरेदी करतात. व्यापारी बांधावरून याच दरात धान खरेदी करतात. शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांकडे अथवा सरकारी खरेदी केंद्रावर धान विकायला नेल्यास बारदाना, वाहतूक व हमाली आदी खर्च शेतकऱ्यांना वेगळा दिला जाताे, अशी माहिती नवीन पाटील, कैलास येसगे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी दिली.
जाड्या धानाचा वापरजाड्या धानापासून तयार केलेल्या तांदळाचा वापर रेशनिंगसह पाेहे, मुरमुरे, लाह्या तयार करण्यासाठी, तसेच इडली, डोसा, अप्पे यासह अन्य दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी केला जाताे.