वाशिम : रेशनच्या धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी पुरवठा विभागाने चोख उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, रेशन दुकानांवर धान्य आल्याचा व दुकानावरून धान्य घेतल्याचा मेसेज संबंधित लाभार्थ्याच्या मोबाइलवर येणार आहे. त्यासाठी रेशन दुकानात आधारकार्ड आणि मोबाइल क्रमांकाची नोंदणी करणे आवश्यक आहे.
रेशन दुकानातील धान्य अनेकदा काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याचे उघडकीस आले आहे. हा प्रकार कायम बंद व्हावा, यासाठी शासनाचे सर्वंकष प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्व रेशनकार्ड आधार क्रमांकाशी लिंक करण्यात येत आहेत.
सोबतच रेशन दुकानांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, कोणत्या गोदामातून रेशन दुकानात किती धान्य पाठविले, तसेच दुकानातून किती आणि कधी धान्य उचलले, याची माहिती रेशनकार्ड धारकांच्या मोबाइलवर एसएमएसने देण्यात येणार आहे.
त्यासाठी एसएमएस गेटवे हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. रेशनकार्डधारकांनी ही सुविधा विभागाकडून तसे प्रयत्न केले जात असल्याचे दिसत आहे. नागरिकांनी देखील धान्य वाटप प्रणालीत प्रत्यक्ष सहभाग नोंदविण्याकरिता मोबाईल क्रमांक रेशनकार्डाशी लिंक करावा, असे आवाहन करण्यात आले.
दुकानात धान्य आले तर मोबाइलवर कळणार!
'एसएमएस गेटवे' या 'सॉफ्टवेअर'चा वापर करून रेशनकार्ड धारकांच्या मोबाइल क्रमांकावर गोदामातून रेशन दुकानात किती धान्य कधी पाठविण्यात आले, याची माहिती दिली जाणार आहे.
तुम्हाला काय करावे लागणार?
नियमित वापरात असलेला मोबाईल क्रमांक रेशनकार्डशी जोडून घेणे आवश्यक आहे. धान्य मिळणाऱ्या रेशन दुकानात जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करता येते, अशी माहिती प्राप्त झाली.
नंबर अपडेट करायला पैसे लागतात का?
शिधापत्रिकाधारकांना मोबाईल क्रमांक शिधावाटप प्रणालीशी लिंक करण्यासाठी संबंधित दुकानात जावे लागते. या प्रक्रियेकरिता कुठलेही शुल्क आकारले जात नाही.
धान्य वितरण प्रणाली पूर्णतः पारदर्शक करण्याचे सर्वकष प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिधावाटप प्रणालीशी नागरिकांचे मोबाईल क्रमांक जोडले जात आहे. लाभार्थीनी ही प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करावी. - बाळासाहेब दराडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिम
तुमच्या नावाचे रेशन दुसरे कोणी उचलले तर?
कार्डधारकाने दुकानातून रेशन घेताच त्याचा मेसेज लिंक केलेल्या मोबाईलवर धडकणार आहे. यामुळे आपल्या कार्डवर कुणी दुसऱ्यानेच रेशन घेतल्यास ते तत्काळ कळणार आहे.
१.७९ लाख रेशनकार्डधारकांचा नंबर अपडेट
जिल्ह्यातील १.७९ लाख रेशनकार्डधारकांचा मोबाईल नंबर रेशनकार्डशी जोडल्या गेला आहे. उर्वरित लाभार्थीनी ही प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी, असे आवाहन केले जात आहे.
किती गहू-तांदूळ घेतला मोबाइलवर कळणार!
मोबाईल क्रमांक लिंक असल्याने कार्डद्वारे गहू आणि तांदूळ नेमका किती घेतला, ही माहिती देखील मोबाईलवर तत्काळ कळणार असल्याने गैरप्रकार थांबणे शक्य होणार आहे. धान्य मिळण्याकरिता स्वतः चा मोबाइल क्रमांक रेशनकार्डशी अपडेट करून घेणे आवश्यक आहे.
कोणत्या तालुक्यात किती लाभार्थी?
तालुका | शिधापत्रिकाधारक | मोबाईल अपेडेट केले |
वाशिम | ४८,१५६ | ३५,३०० |
मालेगाव | ४१,७०७ | २६,०५० |
रिसोड | ४५,०९४ | ३६,००८ |
मंगरूळपीर | ३७,८०१ | २२,१०० |
मानोरा | ३७,०८१ | ३१,०१० |
कारंजा | ४०,६७६ | २८,६०० |
एकूण लाभार्थी | २,१३,४३४ | १,७९,०६८ |