भटक्या कुत्र्यांनी लहान मुलाचा चावा घेतल्याच्या बातम्या हमखास वाचायला मिळतात. अलीकडेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संसर्गजन्य आजार प्रतिबंध आणि नियंत्रण समितीची बैठक झाली. त्यात गेल्या सात महिन्यांत सात लाख नागरिकांना कुत्र्यांनी चावल्याचे निष्पन्न झाले.
रेबीज हा एक लस प्रतिबंधात्मक प्राण्याकडून मानवास होणारा (झुनोटिक), विषाणूजन्य रोग आहे जो मध्यवर्ती मज्जासंस्थेवर परिणाम करतो. अंटार्क्टिका वगळता सर्व खंडांवर रेबीज आढळतो. रेबीज कुत्रे, मांजर आणि वन्यप्राण्यांसह सस्तन प्राण्यांत संक्रमित होतो.
रेबीज लाळेद्वारे पसरतो, सामान्यतः चाव्याद्वारे, ओरखडे किंवा श्लेष्मल त्वचेच्या थेट संपर्काद्वारे (उदा. डोळे, तोंड किंवा उघड्या जखमा), मानवी रेबीज मृत्यूचे बहुसंख्य स्रोत कुत्रे आहेत, जे मानवांना होणाऱ्या सर्व रेबीज संक्रमणांपैकी महत्त्वाचे कारण आहे.
रेबीजचा कुत्रा कसा ओळखाल?
१) कोणत्याही प्राण्याचा चावा रेबीजकरिता कारणीभूत ठरू शकतो. रेबीजच्या प्राण्याचे वर्तनामध्ये अचानक बदल होणे आढळते.
२) उत्तेजक वर्तन, भ्रम, समन्वयाचा अभाव, हायड्रोफोबिया (पाण्याची भीती) आणि एरोफोबिया (ताजी हवेची भीती) मध्ये होतो. कार्डिओ-रेस्पीरेटरी अरेस्टमुळे काही दिवसांनी मृत्यू होतो.
३) प्रोग्रेसिव्ह अर्धांगवायू हा मागून पुढे हळूहळू विकसित होतो आणि शेवटी मृत्यू होतो. रेबीज संसर्ग शोधण्यासाठी सध्या उपलब्ध चाचणी पद्धतीचा अवलंब करणे योग्य ठरते.
कुत्रा चावू नये म्हणून काय करावे?
• कुत्रा मागे लागल्यास त्याचा सामना कसा करावा, याचे मूलभूत प्रशिक्षण पालकांनी द्यावे.
• एखादा कुत्रा जवळ आला तर शांत राहा आणि पळून जाऊ नका. याकरिता तो श्वान कशास घाबरतो ते पाहून कृती करावी उदा. फवारा (सेंट), हातातील एखादी वस्तू उगारणे व मोठ्या आवाजात रागावणे, बऱ्याच वेळेस कुत्रा खूप जोरात आल्यास हातातील एखादी वस्तू पुढे करावी.
• कुत्र्याला घाबरवू नका, विशेषतः जर तो त्याच्या पिल्लांचे रक्षण करत असेल तेव्हा तर मुळीच नाही.
• कुत्र्याला चिडवू नका, कुत्र्याला चिडवणे किंवा दुखवणे टाळा.
• झोपलेल्या किंवा खात असलेल्या कुत्र्याला त्रास देणे टाळा.
• कुत्र्यापासून खेळणी दूर नेऊ नका.
• अतिउत्साही खेळ कमी करा, पळापळी/पाठलाग करण्यासारखे खेळ खेळू नका. यामुळे कुत्र्याच्या आक्रमकतेला प्रोत्साहन मिळू शकते.
• कुत्र्यांना गोष्टींचा पाठलाग करणे आणि पकडणे फार आवडते. कुत्रा मागे लागल्यास पळू नका.
• स्थिर उभे राहा आणि आपले हात आपल्या बाजूला ठेवा.
श्वानदंश झाल्यास काय करावे?
• प्राण्यास श्वानदंश झाल्यासः जखमा पूर्णपणे धुणे, पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन रेबीज लसीचा कोर्स करावा व उपचार करावेत.
• व्यक्तीस श्वानदंश झाल्यासः जखमा पूर्णपणे धुणे, आरोग्य सेवा/दवाखान्यात जाऊन वैद्यकीय उपचार त्यांच्या सल्ल्याने घ्यावेत उदा. मानवी रेबीज लसीचा कोर्स घ्यावा.
• एखाद्या व्यक्त्तीला हडबडलेल्या प्राण्याने चावा घेतल्यास किंवा ओरबाडले असल्यास, त्यांनी ताबडतोब नजीकच्या रुग्णालयास भेट द्यावी.
डॉ. राजीव गायकवाड
औषधवैद्यक शास्त्र विभाग, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय