तलाठ्याकडे न जाता घरबसल्या सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद करण्यासाठी उपलब्ध असलेल्या मोबाइलवरील ई-पीक पाहणी अॅपवर राज्यात आतापर्यंत ८९ टक्के क्षेत्रावरील पिकांची नोंद करण्यात आली आहे. त्यात नागपूर विभागाने आघाडी घेतली असून येथे ८३ टक्के क्षेत्राची नोंद करण्यात आली आहे. तर ३८ लाख हेक्टरवरील सोयाबीन पिकाची नोंद झाली आहे. पीक पाहणीची अंतिम तारीख १५ ऑक्टोबर असून त्यानंतर तलाठी स्तरावरील नोंद करण्यास सुरुवात होणार आहे.
राज्यात १ जुलैपासून ही नोंदणी सुरू झाली असून आतापर्यंत १ कोटी ८ लाख ९५ हजार ६६८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची नोंद करण्यात आली आहे. त्यात नागपूर विभागात १६ लाख ९५ हजार ७२३ अर्थात ८३ टक्के क्षेत्रावरील पिकांची नोंद करण्यात आली आहे. त्याखालोखाल नाशिक विभागात २५ लाख ७ हजार ३५६ हेक्टर अर्थात ७८.४६ टक्के क्षेत्रावरील पिकांची नोंद झाली आहे. सर्वात कमी ५५.८५ टक्के क्षेत्रावरील पिकांची नोंद छत्रपती संभाजीनगर विभागात झाली आहे.
शेतकऱ्यांनी या नोंदलेल्या ई-पीक पाहणीच्या आधारे पीक विमा दावे निकाली काढण्यासाठी, पीक कर्ज वाटप, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी नोंदवलेली पीक पाहणी ४८ तासांमध्ये स्वतःहून केव्हाही एकदा दुरुस्त करता येणार आहे, अशी माहिती ई-पीक पाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक श्रीरंग तांबे यांनी दिली.
आतापर्यंत राज्यातील १ कोटी ६७ लाख २९ हजार ९६७ शेतकरी सभासदांनी अॅपवर नोंद केली आहे. तर गेल्या वर्षी खरीप हंगामात एकूण सरासरी पीक क्षेत्राच्या ९१.४० टक्के शेतकऱ्यांनी या अॅपवर पीक पेरणीची नोंदणी केली होती. तसेच रब्बी हंगामातही ९९.२७ टक्के शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती, अशी माहितीही तांबे यांनी दिली.
५० लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड
पीकनिहाय नोंदीची आकडेवारी पाहिल्यास सोयाबीन पिकांची सर्वाधिक नोंद झाली आहे. राज्यात कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार सुमारे ५० लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. ई-पीक पाहणी अॅपच्या आधारे राज्यात ३८ लाख ४ हजार ७९० हेक्टरवरील सोयाबीनची नोंद झाली आहे. त्यानंतर १९ लाख ७५ हजार ७१७ हेक्टरवरील कापूस पिकाची तर ९ लाख १९ हजार ५२९ हेक्टरवरील भात पिकाची नोंद करण्यात आली आहे