कृषी विभागाकडे विस्ताराचे फारसे काम शिल्लक नाही. त्यामुळे, कृषी विभागाकडील अनावश्यक असणाऱ्या योजनांच्या अनुषंगाने, कर्मचारी कमी करून खर्चामध्ये बचत करता येईल का हे तपासणे आवश्यक असल्याचे निरीक्षण औरंगाबाद विभागाचे माजी विभागिय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी नोंदवले आहे.
मराठवाड्यातील शेतकरी नैराश्याच्या गर्तेत असल्याचा अहवाल नुकताच समोर आला आहे. या अहवालात केंद्रेकर यांनी विविध शिफारशी तर केल्याच आहेत पण कृषी विभागाच्या कामावरही या अहवालात बोट ठेवण्यात आले आहे.
शेतकरी आता सामाजिक माध्यमांचा वापर करत असून व्हॉट्सॲप ग्रुप, युट्यूब, फेसबूक तसेच राज्य शासन व कृषी विद्यापीठांच्या संकेतस्थांचा वापर करून ते शेतीची अद्ययावत माहिती मिळवतात. त्यामुळे कृषी विभागाकडे विस्ताराचे काम शिल्लक राहीले नसून कृषी विभागातील अनावश्यक असणाऱ्या योजनांच्या संदर्भात कर्मचारी कमी करून खर्चात बचत करता येऊ शकते का हे तपासणे गरजेचे असल्याचे मत या अहवालात नोंदवण्यात आले आहे.
कोणत्याही स्वरूपात येणारी नैसर्गिक आपत्ती ही अनिश्चित असल्याकारणाने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसतो. अतिवृष्टी ढगफुटीपुर वादळ दुष्काळ तसेच विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव अशा अनेक कारणांमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास प्रशासकीय पातळीवर पंचनामे करावे लागतात.
राज्यातील हंगामनिहाय लागवडीखालील सरासरी क्षेत्र आणि वाढती महागाई लक्षात घेता खरीप आणि रब्बी हंगामाकरिता किमान 10,000 प्रति एकर म्हणजेच 25000 प्रती हेक्टर एक रकमी ठोक स्वरूपात रक्कम मंजूर करण्याची शिफारसही अहवालात करण्यात आली आहे.
राज्याचे लागवडीखालील क्षेत्र
राज्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 307.58 लाख हेक्टर असून त्यावरील लागवडीखालील सरासरी क्षेत्र 204.66 लाख हेक्टर आहे खरीप हंगामातील ऊस पिकांसह सरासरी लागवड क्षेत्र 152.97 लाख हेक्टर असून रब्बी हंगामातील सरासरी लागवड क्षेत्र 53.98 लाख हेक्टर आहे. उन्हाळी हंगामातील सरासरी लागवड क्षेत्र 3.50 लाख हेक्टर आणि फळबागा खालील क्षेत्र 21.19 लाख हेक्टर एवढे आहे.
अत्यंत चुकीचा रिपोर्ट- संजय शिरसाट
मराठवाड्यातील एक लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्येचे विचार असल्याचा अहवाल नुकताच समोर आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे. या अहवालावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हा अहवाल जर खोटा निघाला तर केंद्रेकरांवर गुन्हा दाखल केला पाहिजे असे शिरसाट म्हणाले.
औरंगाबादमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले," अत्यंत चुकीचा रिपोर्ट सुनील केंद्रेकर यांनी काढला आहे. या अहवालाची चौकशी करा, जर शेतकऱ्यांना आत्महत्यासाठी प्रवृत्त करणारा हा रिपोर्ट असेल तर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. मी मुख्यमंत्र्याकडे कालच याबाबत मागणी केलेली आहे." असेही शिरसाट म्हणाले.