रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय व जैविक खते वापरा, असे आवाहन उपविभागीय तंत्रज्ञान समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी केले.
येत्या खरीप हंगामात रासायनिक खतांचा संतुलित वापर होण्यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई कृषी उपविभागातील गावांमध्ये कृषी विभागाने खत बचतीची विशेष मोहीम हाती घेतली आहे.
त्याचाच एक भाग म्हणून कृषी सहायक पंडित काकडे, सुभाष राठोड, आर. एल. शिरसाट व उपविभागीय तंत्रज्ञान समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी सोमनाथ बोरगाव, आपेगाव, वाणटाकळी येथे शेतकऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले.
सेंद्रिय व जैविक खतांचा वापर वाढविण्यासाठी कृषी विभागाचे उपविभागीय तंत्रज्ञान समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
पिकांच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी केवळ रासायनिक खतांवरच अवलंबून न राहता जमिनीत जास्तीत जास्त सेंद्रिय खते, शेणखत, कंपोस्ट, गांडूळखत, नाडेप खत, बायोडायनामिक कंपोस्ट, हिरवळीचे खत वापरणे आवश्यक असल्याचे शिवप्रसाद येळकर म्हणाले.
तसेच यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्र बारामती यांचे कृषी अॅप्लिकेशन वापरून माती परीक्षण अहवालाच्या आधारे विविध पिकांचे अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी खतांच्या शिफारशीतील मात्रा जाणून घेण्यासाठी अॅप्लिकेशन वापराचे प्रात्यक्षिक यावेळी दाखवले. माती परीक्षणासाठी नमुने देण्याबाबत कृषी सहायक काकडे यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली. यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे
• खतांची मात्रा एकाचवेळी न देता वेगवेगळ्या वेळी विभागून द्यावी. खते व बियाणे दोचाड्याच्या पाभरीने मातीआड पेरून द्यावीत. युरियाबरोबर लिंबोळी पेंडीचा वापर करावा. चुनखडीयुक्त जमिनीत अमोनियम सल्फेट तसेच स्फुरदयुक्त खते जमिनीच्या पृष्ठभागावर फेकून न देता पेरून द्यावीत. सुपर फॉस्फेटयुक्त खते शेणखतात मिसळून दिल्यास स्फुरदाची उपयुक्तता वाढते.
• पिकांच्या फेरपालटीत कडधान्य हिरवळीच्या पिकांचा समावेश करावा म्हणजे सेंद्रिय कर्ब जमिनीत वाढून खतांचा कार्यक्षम वापर होईल. पिकांच्या गरजेनुसार रासायनिक खतांचा पुरवठा करावा. माती परीक्षण अहवालानुसार कमतरतेप्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्याव्यतिरिक्त रासायनिक खतांचा शेणखतामधून जमिनीमध्ये वापर करावा. फवारणीसाठी लोह, मंगल, जस्त, तांबे इत्यादी सूक्ष्म अन्नद्रव्ये चिलेटेड स्वरूपात द्यावीत, असे तंत्रज्ञान समन्वयक शिवप्रसाद येळकर म्हणाले.
हेही वाचा - शेतकऱ्यांनो, सोयाबीनचे एकरी उत्पादन वाढवायचे ना? मग करा या अष्टसूत्रीचा वापर!