राज्य आदिवासी विकास महामंडळाच्या आधारभूत भात खरेदी हंगामात ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी सुरू केली होती. त्यासाठी शेवटची मुदत ३० नोव्हेंबर होती, मात्र, पुरेशी नोंदणी झाली नसल्याने राज्य सरकारने पुन्हा ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
२०२३-२४ मध्ये खरीप हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भात खरेदीसाठी ऑनलाइन पोर्टलवर शेतकऱ्यांना नोंदणीकरिता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. हंगामामध्ये पुरेशा प्रमाणात शेतकरी नोंदणी व्हावी, यासाठी आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरिता मुदतवाढ दिल्याची माहिती पत्राद्वारे दिली आहे. आतापर्यंत मनोर उपप्रादेशिक विभागात एक हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.
आदिवासी विकास महामंडळाच्या भात खरेदी केंद्र, मनोर उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत नावझे, निहे, वरई, हालोली, मेढे, किरवली अशी सहा भात खरेदी केंद्रे सुरू होणार आहेत. ही भात खरेदी केंद्रे आठवडाभरात सुरू होतील, अशी माहिती मनोर उपप्रादेशिक व्यवस्थापक सागर कोटी यांनी दिली.