पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीवरील पुनर्वसनाचे शिक्के काढण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जातं होती. त्याबाबत आता १५ फेब्रुवारीला राज्य सरकारने आदेश काढला असून तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या सात बारावरील पुनर्वसनासाठी असलेले शिक्के काढले जाणार आहेत. त्यामुळे मागील चाळीस वर्षांपासून पुनर्वसनासाठी अडकलेल्या जमिनी मूळ मालकांना पूर्ण अधिकाराने वापरता येणार आहेत.
गुंजवणी प्रकल्पासाठी पुरंदर तालुक्यातील हिवरे, जेऊर, थोपटेवाडी, पिसूर्ती, वीर, तोंडल, परिंचे, वाल्हे, हरणी, राख, गुळूचे, माहूर, मांडकी या गावातील जमिनींवर पुनर्वसनाचे शिक्के होते. त्याचबरोबर रायता प्रकल्पासाठी चांबळी, बोपगाव, हिवरे, भिवरी या गावातील जमिनींवर पुनर्वसनाचे शिक्के मारण्यात आले होते.
अखेर शेतकऱ्यांची मागणी पूर्ण झाली
या भागातील लोकांना आपल्या जमिनी कसताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. मागील चाळीस वर्षापासून या लोकांना या प्रकल्पातून शेतीसाठी पाणीही मिळालं नव्हत किंवा भविष्यात या प्रकल्पातून शेतीसाठी पाणी मिळेल याबाबत शेतकऱ्यांना शास्वती नव्हती. त्यामुळे हे शिक्के काढा, आम्हाला पाणी नको आमची शेती आम्हाला द्या. अशी मागणी प्रामुख्याने गुंजवणी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली होती.
प्रामुख्याने राख, गुळूचे, कर्नलवाडी, वाल्हे या भागातील शेतकऱ्यांनी ही मागणी लावून धरली होती. आता या शेतकऱ्यांची मागणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. याबाबतचं एक परिपत्रक राज्य सरकारच्यावतीने १५ फेब्रुवारीला काढण्यात आले आहे. त्यामुळे मागील चाळीस वर्षापासून पुनर्वसनासाठी अडकलेल्या जमिनी मूळ मालकांना पूर्ण अधिकाराने वापरता येणार आहेत.
प्रकल्प ग्रस्तांचे गाव आणि गट नंबर पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा: https://shorturl.at/esJW7
गुंजवणी प्रकल्पातील बाधितांसाठी आमच्या आजोबांच्या जमिनीवर शिक्के होते. त्यामुळे आमचे चुलत्यांच्या व वडिलांच्या नावे क्षेत्र होत नव्हते. याचा परिणाम आम्हाला पीक कर्ज किंवा शासनाच्या योजनांपासून वंचित रहावे लागत होते. शेतात नवीन काही प्रकल्प राबवायचा असल्यास अडचणी येत होत्या. - जितेंद्र निगडे, संचालक सोमेश्वर साखर कारखाना
१९९४ साली वीस वर्षापूर्वी आमच्या क्षेत्रावर गुंजवणीचे शिक्के मारले होते. नंतरच्या काळात धरणबाधितांनी आमच्या भागातील जमिनी नाकारल्या होत्या. आता पुनर्वसन विभागाने शिक्चे काढले आहेत. पण गुंजवणीचे पाणी मिळणे हा आमचा अधिकार आहे. हे पाणी आमच्या शेतशिवारात आलेच पाहिजे. - बबनराव ताटे, शेतकरी, राख