Join us

पशुसंवर्धनची पुनर्रचना! 'पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मस्त्यव्यवसाय विभागा'स मान्यता; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 6:09 PM

या निर्णयामुळे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायाला चालना मिळणार आहे. याआधी दोन विभाग असल्यामुळे कामांमध्ये एकसूत्रता नव्हती तर पुनर्रचनेमुळे कामाला गती येऊन विकासकामेही वेगाने होण्यास मदत होणार आहे.

पुणे : पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाची पुनर्रचना करण्याचे काम अनेक दिवसांपासून प्रलंबित होते. पण अखेर आता या कामाला मुहूर्त लागला असून आज या दोन्ही विभागाची पुनर्रचना करून या विभागाचे नामकरण 'पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मस्त्यव्यवसाय विभाग' असे करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत ही बैठक पार पडली. 

पुनर्रचनेनंतर पशूसंवर्धन आयुक्तालय व दुग्धव्यवसाय आयुक्तालयाचे एकत्रिकरण करून पुनर्रचनेनंतर 'आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय' असे या पदाचे नाव राहील. त्याचबरोबर राज्यातील ३५१ तालुक्यांत तालुका पशूसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी कार्यालय सुरु करण्यात येणार असल्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे १६९ तालुक्यांत तालुका लघू पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय सुरु करण्यात येतील. राज्यातील २ हजार ८४१ पशू वैद्यकीय श्रेणी दोन दवाखान्यांचे श्रेणी एक दवाखान्यात श्रेणीवाढ करण्यात येणार आहे. त्याशिवाय १२ हजार २२२ नियमित व कंत्राटी तत्वावरील ३ हजार ३३० पदांच्या वेतनासाठी १ हजार ६८१ कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

दरम्यान, या निर्णयामुळे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायाला चालना मिळणार आहे. याआधी दोन विभाग असल्यामुळे कामांमध्ये एकसूत्रता नव्हती तर पुनर्रचनेमुळे कामाला गती येऊन विकासकामेही वेगाने होण्यास मदत होणार आहे. 

टॅग्स :दुग्धव्यवसायशेतीशेती क्षेत्रमहाराष्ट्र