Join us

हरभरा पिकातील मुळसड आणि अतिरिक्त वाढ समस्येवरील उपाययोजना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2023 11:24 AM

कोरडवाहु अथवा बागायती परिस्थितीत हरभरा पिकाची लागवड करतांना, या पिकाच्या अडचणींवर आधारित, नियोजन व व्यवस्थापनाच्या माध्यमातून, नुकसानीची पातळी कमी राखुन, उत्पादनात अपेक्षित वाढ होत असल्याचे दिसुन येते.

रबी हंगामातील अत्यंत महत्वपूर्ण दाळवर्गीय पिक म्हणजे हरभरा होय. भारतात दाळवर्गीय पिकाखालील क्षेत्रात या पिकाचा क्रमांक पहिला लागतो. कोरडवाहु अथवा बागायती परिस्थितीत हरभरा पिकाची लागवड करतांना, या पिकाच्या अडचणींवर आधारित, नियोजन व व्यवस्थापनाच्या माध्यमातून, नुकसानीची पातळी कमी राखुन, उत्पादनात अपेक्षित वाढ होत असल्याचे दिसुन येते. त्याकरीता हरभरा पिकाच्या खालील समस्यांवर आधारीत नियोजन व व्यवस्थापन केल्यास नुकसानीची पातळी कमी राखल्या जावून उत्पादकतेत शाश्वत वाढ शक्य होते

हरभरा मुळसडहरभऱ्याचे पिक रोपटे अवस्थेत (साधारणत: १२-१५ पानांच्या अवस्थेत) असतांना   म्हणजेच १७ ते २२ दिवसांचे पिक असतांना रोपावस्थेत हरभऱ्याची झाडे सुकण्यास सुरवात होते. रोपट्यांची मुळे कुजलेली आढळतात व मुळांवर जमिनीलगत पांढरी बुरशी वाढलेली दिसते, रोपटे वाळतात, सुकतात व जागच्या जागी जीरुन नष्ट होतात. यालाच मुळसड नावाने संबोधल्या जाते. रोपटे अवस्थेतील झाडे सुकल्यामुळे, हरभरा पिकाचे मोठे नुकसान होतांना प्रत्येक हंगामात आढळते. ज्या शेतात अशा प्रकारची समस्या उदभवत असेल, त्याकरीता खालीलप्रमाणे उपाययोजना करावी.पेरणीपुर्वी साधारणत: अर्धा ते एक तास आधी ट्रायकोडर्मा ५ ते १० मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी.ट्रायकोडर्मा उपलब्ध नसल्यास रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केल्याशिवाय हरभरा पिकाची पेरणी करु नये.खोल नांगरटी करुन जमीन तयार करणे स्प्रिंकलरच्या सहाय्याने ओलीत करणे. जमीन वाफसा स्थितीत आल्यानंतर पेरणी करणे पिक रोपटे अवस्थेच्या सुरुवातीच्या अवस्थेत असतांना हलके ओलीत देणे.- ओलीताची व्यवस्था होवून सुध्दा शेतकरी पेरणीची घाई करतांना आढळतात त्यामुळे जमिनीची खोल नांगरट याबाबीकडे दुर्लक्ष होतांना दिसते. शेतात रोटाव्हेटर अथवा तत्सम मशागत करुन लगेचच पेरणी करतात. यामुळे हरभरा पिकात मुळसडचा प्रादुर्भाव दरवर्षी वाढतांना दिसत आहे.

हरभरा मोसोंडणे (अतिरिक्त वाढ)पानथळ अथवा पानबसन जमीनीत हरभरा पिकाची लागवड, ओलीताचे चुकीने व्यवस्थापन, बागायती हरभरा पिकात युरियाचा अवाजवी वापर, यामाध्यमातून हरभरा पिकाची अवास्तव वाढ होण्यास कारणीभुत ठरते व उत्पादनात घट संभवते. त्याकरीता खालीलप्रमाणे उपाययोजना करावी.ओलिताचे व्यवस्थापन करतांना पेरणीपुर्वीचे ओलित व त्यानंतर वाढीची अवस्था आटोपल्यानंतर वाणनिहाय कळी अवस्थेच्या सुरुवातीला ओलीत द्यावे. यावेळी स्प्रिंकलरचा वापर करतांना जमीनीच्या प्रकारानुसार, ओलीत देवून हरभरा पेरला अथवा कोरड्यात पेरणी केली म्हणजेच जमिनीतील ओलीची स्थिती पाहुन पाण्याच्या पाळीची वेळ ठरवावी. (पाणी देण्याचा कालावधी म्हणजेच स्प्रिंकलर किती वेळासाठी लावायचा याचा कालावधी) अन्यथा बुरशीजन्य मुळसड रोगाचा प्रादुर्भाव वाढुन मोठे नुकसान संभवते. यानंतर गरज भासल्यास वाणनिहाय घाट्यांमध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेला ओलित द्यावे. यावेळी सुध्दा जमीनीतील ओलीच्या स्थितीनुसार निर्णय घ्यावा. यासाठी जमिनीला भेगा पडतांना आढळल्यास, त्यानुसार ओलीताचा निर्णय घ्यावा लागेल.हरभरा पिकात निंदणीच्या वेळी महिला मजुर घरच्या भाजीसाठी झाडांची शेंडे खुडतांना आढळतात. त्यांच्याकडे डोळेझाक करुन शेंडे खुडु द्यावेत अथवा यावेळी (पेरणीपासुन साधारणत: २७ ते ३२ दिवसांनी) ब्लेड मशीनच्या सहाय्याने पिकाची शेंडे छाटणी करावी. याद्वारे पिकाची अवास्तव उंचवाढ टाळता येते. यासाठी हरभरा पिकात क्लोरोमकॉट क्लोराईड अथवा मॅपिकॉट क्लोराईड या वाढ रोधकांचा सुध्दा वापर शेतकरी करतांना आढळतात.

प्रा. जितेंद्र दुर्गेसहयोगी प्राध्यापक (कृषि विद्या)श्री शिवाजी कृषि महाविद्यालय, अमरावती

टॅग्स :हरभराशेतकरीशेतीपीकरब्बी