Join us

Rice Export : केवळ बासमतीच नव्हे, इतर तांदुळही करता येणार निर्यात; निर्यातीवरील निर्बंध हटवले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 4:57 PM

Remove Rice Export Ban : हरियाणामध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे बोलले जात असले, तरी सध्या भात उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.

Pune : देशातील काही राज्यांतील निवडणुकांच्या तोंडावर केंद्र सरकारने आणखी एक निर्णय घेतला आहे. बिगर बासमती तांदळावरील निर्यातबंदी केंद्र सरकारने हटवली असून आता किमान निर्यात मूल्य ४९० डॉलर प्रती टन या दराने सर्व प्रकारच्या तांदळाची निर्यात करता येणार आहे. यापूर्वी केवळ बासमती तांदळाची निर्यात करता येणे शक्य होते. तसेच साध्या तांदळाची निर्यात केंद्र सरकारमार्फत केली जात असे. मात्र, आज झालेल्या निर्णयानुसार सर्व प्रकारच्या तांदळाची निर्यात आता खुली झाली आहे.

दरम्यान निर्यात होणाऱ्या या तांदळावर किमान निर्यात मूल्यासोबत (MEP)  निर्यात शुल्काचीही अट असणार आहे. केंद्र सरकाने आधी असलेले किमान निर्यात मुल्य २०% टक्क्यावरून १० % करम्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती असून त्यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक लवकरच निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, हरियाणामध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे बोलले जात असले, तरी सध्या भात उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. कांदा निर्यातबंदी उठवल्याचा निर्णयही महाराष्ट्र आणि इतर राज्यातील निवडणुकांना समोर ठेवून घेतला असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीभात