Join us

सौर उर्जिकरणासाठी जमीन भाड्याने द्या आणि एकराला ५० हजार मिळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2023 12:01 PM

या योजनेअंतर्गत कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्याच्या दृष्टीने लागणारी खासगी जमीन महावितरणला भाडेपट्ट्याने उपलब्ध करून देताना जागेची त्या वर्षीच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने निर्धारित केलेल्या किमतीच्या ६ टक्के दरानुसार परिगणत केलेला दर किंवा प्रति वर्ष एकरी ५० हजार अथवा प्रति हेक्टर १ लाख २५ हजार रुपये दराने वार्षिक भाडेपट्ट्याचा दर निश्चित करण्यात आला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील कृषी फिडर सौर ऊर्जित करून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२.०' या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यात २०१ विद्युत उपकेंद्र सौर ऊर्जिकरण होणार आहे. यामधून २ हजार १४७ मेगावॅट वीजनिर्मिती होणार असून त्यासाठी शासकीय आणि खासगी अशी एकूण १० हजार ७३६ एकर जमिनीची गरज भासणार आहे.

महावितरण व जिल्हा प्रशासन या जागेसाठी प्रयत्नशील असून, जमिनी देण्याबाबत शेतकऱ्यांनाही आवाहन करण्यात आले आहे. उपकेंद्राच्या परिसरात असलेल्या आहे. जमीन मालकांनी जमीन भाड्याने देऊन नियमित उत्पन्न मिळविण्याची संधीसुद्धा या योजनेत असून, याचा लाभ घ्यावा व योजना यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले.

राज्यातील ज्या ग्रामीण भागांमध्ये गावठाण व कृषी वीज वाहिन्यांचे विलगीकरण झाले आहे, अशा कृषी वीज वाहिन्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करून दिवसा आणि भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात येत आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी जमीन तातडीने व्हावी याकरिता प्रत्येक जिल्ह्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे

योजनेद्वारे कृषी अतिभारीत उपकेंद्राच्या ५ कि. मी. च्या परिघात सौर प्रकल्प कार्यान्वित करून सौर ऊर्जा प्रकल्प महावितरणच्या जवळच्या ३३/११ केव्ही उपकेंद्राशी थेट जोडला जाईल. त्यामुळे या कृषी वाहिन्यांवरील कृषी ग्राहकांना दिवसा वीज देण्याचा महावितरणचा प्रयत्न आहे.

५० हजार रुपये एकर मोबदलाया योजनेअंतर्गत कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्याच्या दृष्टीने लागणारी खासगी जमीन महावितरणला भाडेपट्ट्याने उपलब्ध करून देताना जागेची त्या वर्षीच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने निर्धारित केलेल्या किमतीच्या ६ टक्के दरानुसार परिगणत केलेला दर किंवा प्रति वर्ष एकरी ५० हजार अथवा प्रति हेक्टर १ लाख २५ हजार रुपये दराने वार्षिक भाडेपट्ट्याचा दर निश्चित करण्यात आला आहे. प्रत्येकी वर्षी ३ टक्के सरळ पद्धतीने भाडेपट्टी दरात वाढ करण्यात येईल.

ग्रामपंचायतीही देऊ शकतात जमिनीग्रामपंचायतीही यासाठी जमीन देऊ शकतात. ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन योजनेत सहभागी होण्याचा विहित कालावधीत ठराव घ्यावा. ज्या ग्रामपंचायती स्वयंस्फूर्तपणे सहभागी होतील त्यांना शासनाकडून प्रोत्साहन म्हणून प्रतिवर्ष ५ लाखांप्रमाणे तीन वर्षांत मिळून १५ लाखांचा निधी दिला जाणार आहे.

येथे करा अर्जया अनुषंगाने शेतकयांनी आपली जमीन भाडेतत्त्वावर देण्यासाठी https://dcland.mahadiscom.in/SKVYDLSolar/  संकेतस्थळावर अर्ज करावा. या पोर्टलवर माफक नोंदणी शुल्क भरून शेतकरी किंवा तत्सम व्यक्ती विकेंद्रित सौर प्रकल्प उभारण्यासाठी आपली जमीन महावितरणला भाड्याने देऊ शकतात.

टॅग्स :शेतकरीशेतीवीजमहावितरणराज्य सरकार