नितीन पाटील
बोरगाव : पुरामुळे अथवा अतिवृष्टीने ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्यांनी ऑनलाइन क्रॉप इन्शुरन्स अॅप्लिकेशन या संकेत स्थळावर किंवा १४४४७ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवली तरच शेतकऱ्यांनो तुम्हाला मदत मिळणार आहे. अन्यथा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळणार नाही.
गेल्या २० दिवसांपासून पडत असणाऱ्या संततधार पावसामुळे नदी काठावरील पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेल्याने, तसेच अतिवृष्टी झाल्याने कुजून बळीराजाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे बळीराजाला मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
या नुकसानीची भरपाई हवी असेल तर टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी लागणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या बांधावर तालुका कृषी विभागाचा व विमा कंपनीचा एक प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामा करील, नंतर शेतकऱ्यांना याचा लाभ प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे.
पीक विम्यासाठी वाळवा तालुक्यातील १३००० हजार हेक्टर क्षेत्राची नोंद केली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंतिम मुदत ३१ जुलै असली तरी ज्यांनी यापूर्वी पीकविमा उतरवला आहे अशा शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करून याचा लाभ घेता येणार आहे.
ही नुकसानभरपाई फक्त खरीप हंगामातील भात, सोयाबीन, भुईमूग व मका या पिकांसाठीच मिळणार आहे. ही मदत उंबरठा उत्पादनाच्या सरासरीवरून विमा संरक्षित रक्कम दिली जाते. उंबरठा उत्पादन याचा अर्थ मागील ७ वर्षांच्या उत्पादनाच्या त्या भागातील सरासरी उत्पादन धरून ही मदत दिली जाते.
या नियमाने पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी शासनाची ही योजना अतिशय फायदेशीर अशीच आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
इतकी मिळणार मदत
भुईमूग व सोयाबीन हेक्टरी ४० हजार रुपये, भात पिकासाठी हेक्टरी ५० हजार रुपये, मका पिकासाठी ३५९८ रुपये मदत मिळणार आहे.
शासनाची नैसर्गिक आपत्ती मदतीबाबत अद्याप निर्णय झाला नसून सध्या पीक विम्याची मदत मिळणार आहे. मात्र, शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्ती व विमा योजनेच्या दोन्ही तक्रार नोंद कराव्यात व तक्रारी दाखल कराव्यात शासकीय पातळीवर निर्णय झाल्यास एक तरी मदत मिळेल. - इंद्रजीत चव्हाण, वाळवा तालुका कृषी अधिकारी