Join us

आवश्यकता हरभऱ्याची सुरू केले तुरी खरेदी केंद्र; उत्पादकांअभावी हमी केंद्र ओसाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 19:04 IST

Tur Hamibhav Kharedi Kendra : हमीभाव केंद्रांकडे नोंदणी केलेल्या शेतकाऱ्यांपैकी अद्यापपर्यंत एकही शेतकरी या केंद्राकडे फिरकला नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी खरेदी केंद्र ओसाड पडले आहेत.

शेतकऱ्यांना तुरीला ७ हजार ७५० रुपयांचा हमीभाव मिळावा, यासाठी जिल्ह्यात नाफेडकडून १८ तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले.

मात्र, या केंद्रांकडे केवळ ५८९ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली असून, अद्यापपर्यंत एकही शेतकरी या केंद्राकडे फिरकला नसल्याचे दिसून येत आहे.

मराठवाड्याच्या परभणी जिल्ह्यात खरीप हंगामात ४० हजार हेक्टर क्षेत्रावर यंदा तुरीचे उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले होते. तुरीची शेतकऱ्यांनी पेरणी केल्यावर बाजारात १२ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव होता.

त्यामुळे शेतकऱ्यांनीही पिकांवर मोठा खर्च केला. महागडी औषधे आणि खते या पिकांसाठी वापरली. मात्र, यंदाची तूर बाजारात विक्रीसाठी आल्यानंतर १० हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव आज त्यांना थेट ६ हजार रुपयांवर आला. त्यामुळे तूर उत्पादकांमधून शासनाविरुद्ध ओरड होऊ लागली.

शेतकऱ्यांच्या तुरीला केंद्र शासनाच्या ७५५० रुपयांचा हमीभाव मिळावा, यासाठी नाफेडच्या माध्यमातून जिल्ह्यात १८ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रांच्या माध्यमातून तूर खरेदी करण्याचा निर्णय करण्यात आला.

मात्र, नोंदणी केलेल्या ५८९ शेतकऱ्यांपैकी एकही शेतकरी अद्यापपर्यंत या केंद्राकडे तूर विक्रीसाठी आला नसल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाकडून मिळाली.

१८ पैकी केवळ १० केंद्रांवर तूर उत्पादकांची नोंदणी

• नाफेडकडून जिल्ह्यात परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, पूर्णा यांसह १८ ठिकाणी तुरीचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. मात्र, यातील केवळ सेलू केंद्रावर सर्वाधिक १९७, तर बोरी केंद्रावर १५२ तूर उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

• उर्वरित केंद्रावर केवळ एक-दोन शेतकऱ्यांची नोंदणी आहे. मात्र, अद्यापपर्यंत एकाही शेतकऱ्याने तूर विक्रीसाठी केंद्राकडे धाव घेतली नसल्याचे दिसून आले.

आवश्यकता हरभऱ्याची सुरू केले तुरीचे केंद्र

• शेतकऱ्यांनी तुरीचे उत्पादन अधिक घेतले नाही. त्यामुळे जे उत्पादन आहे, ते कुटुंबापुरते मर्यादित आहे.

• दुसरीकडे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात जवळपास १ लाख हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याचे उत्पादन घेतले आहे.

• बाजारात ६ हजार रुपये प्रतिक्विंटल असणारा भाव थेट ५ हजार रुपये प्रतिक्विंटलवर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या हरभऱ्यासाठी हमीभाव खरेदी केंद्राची गरज आहे.

• असे असतानाही नाफेडने हरभऱ्याऐवजी तुरीचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले आहेत. त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

हेही वाचा : विदर्भाच्या ७३ वर्षीय शेतकऱ्याची प्रेरणादायी कामगिरी; सेंद्रिय शेतीत पिकविला ४४५ ग्रॅम वजनाचा टोमॅटो

टॅग्स :शेती क्षेत्रबाजारशेतकरीमराठवाडापुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्ड