राहुल नवघरे
रेशीम शेती व त्यावर आधारित उद्योगाला चालना देण्यासाठी जिल्हा रेशीम उद्योग विभागामार्फत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. बीड जिल्ह्यात तुती लागवड आणि रेशीम कोष उत्पादन मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहे. याही पुढे जाऊन आता या कोषातून धागा निर्मितीसाठी दोन रेशीम धागा निर्मिती प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे या रेशीम व्यवसाय, उद्योगाला गती मिळणार आहे.
रेशीम कोष उत्पादन केल्यानंतर पुढे त्यावर प्रक्रिया करून या कोषातून रेशीम तयार करण्यासाठी रेशीम धागा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यात सध्या चार रेशीम धागा निर्मितीचे छोटे प्रकल्प कार्यान्वित आहेत.
गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांनी ८२५ मेट्रिक टन कोष निर्मिती करून हा रेशीम धागा निर्मिती प्रकल्पांना विक्री केला आहे. कोषातून रेशीम धागा तयार करून पुढे हा धागा परराज्यात कापड उद्योगांना विक्री केला जात आहे. यामुळे रेशीम धागा निर्मिती प्रकल्प शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे.
दीड कोटींचा मोठा प्रकल्प
बीड शहर व परिसरात शासनाकडून दोन रेशीम धागा निर्मिती प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी एक मोठा प्रकल्प असून तो दीड कोटी रुपयांचा आहे. दुसरा प्रकल्प हा ८० लाखांचा आहे.
आणखी दोन प्रतीक्षेत
धागा निर्मिती प्रकल्पांना शासन स्तरावर मंजुरी मिळत आहे. त्यामुळे आणखी दोन मोठ्या प्रकल्पांचे प्रस्ताव जिल्हा रेशीम उद्योग विभागाकडून शासनस्तरावर प्रतीक्षेत आहेत. या प्रकल्पांच्या प्रस्तावांनाही लवकरच मंजुरी मिळेल. त्यामुळे रेशीम धागा निर्मिती प्रकल्पांना लागणाऱ्या रेशीम कोषांना भाव चांगला मिळेल. याचा शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल.
एका कोषातून एक किलोमीटर धागा
सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या चार धागा निर्मिती प्रकल्पांना शेतकऱ्यांकडून जे कोष मिळतात त्या कोषांचा दर्जा अत्यंत उच्च आहे. एका कोषातून एक ते दीड किलोमीटरचा धागा तयार होतो. जेवढा लांब धागा तयार होईल तेवढा कोष दर्जेदार असतो. - एस. बी. वराट, जिल्हा रेशीम विकास अधिकारी.