Join us

Reshim Sheti : लाखात उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेतीचा सोलापूर जिल्ह्याला लागतोय लळा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 11:18 AM

Sericulture ऊस, केळी, डाळिंब, कांदा या व इतर पिकांच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा ओढा असताना आता रेशीम शेती फुलविण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी पुढे येत आहे.

अरुण बारसकरकुरुल येथील विजय कांबळे या तरुणाने बीएस्सी अॅग्री झाल्यानंतर वडिलोपार्जित शेतीकडे लक्ष देण्याचे ठरविले. प्रामुख्याने ऊस, द्राक्ष ही पिके अगोदर घेतली जात असायची.

विजय यांनी २०२० मध्ये एक एकर क्षेत्रात तुतीची लागवड केली. साडेतीन लाख रुपये उत्पन्न मिळाल्याने २०२२ मध्ये अडीच एकर नव्याने लागवड केली. लागवड केल्यापासून प्रत्यक्ष उत्पादन चार महिन्यांत सुरू होते.

आता दरवर्षी १० लाख रुपये मिळतात. लागवडीसाठी अनुदान मिळते. मजुरी, औषधे, मशागतीसाठी साडेतीन एकराला दोन लाखांपर्यंत खर्च येतो, असे विजय सुनील कांबळे यांनी सांगितले.

ऊस, केळी, डाळिंब, कांदा या व इतर पिकांच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा ओढा असताना आता रेशीम शेती फुलविण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी पुढे येत आहे.

यावर्षी आतापर्यंत १०५ शेतकऱ्यांनी १६९ एकरात तुतीची लागवड केली असून, आणखीन दीड महिने लागवड कालावधी आहे. जिल्ह्यात एकूण ११७७ एकर रेशीम शेती झाली आहे.

कमी खर्चात अधिक उत्पादन, शिवाय लागवडीसाठी अनुदान मिळणारे तुतीचे पीक आहे. मागील वर्षी पाऊस कमी पडल्याने नवीन तुती लागवड झाली नाही. आहे त्या क्षेत्रालाही पाणीटंचाईचा फटका बसला होता. त्यामुळे मागील वर्षी तुतीच्या क्षेत्रात मोठी घट झाली होती.

मात्र यंदा पाऊस चांगला होत असल्याने शेतकऱ्यांचा तुतीच्या लागवडीसाठी उत्साह वाढला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १६९ एकरावर नव्याने तुतीची लागवड झाली असून, आणखीन सव्वाशे एकरात ऑक्टोबरपर्यंत तुतीची लागवड होईल, असे रेशीम कार्यालयाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यात मागील वर्षापर्यंत ८४९ शेतकऱ्यांकडे १००९.५ एकर तुतीचे क्षेत्र आहे. त्यात यावर्षी वाढलेल्या क्षेत्रासह एकूण ९५३ शेतकऱ्यांकडे ११७७.५ एकर तुतीचे (रेशीम शेती) क्षेत्र झाले आहे.

एमआरईजीएसमधून एकरी ४ लाख १८ हजार, सिल्क समग्र योजनेतून तुती तर लागवडीसाठी ३ लाख ७५ हजार अनुदान शासन देते. मनरेगामधून लाभ घ्यायचा असेल तर किमान पाच अल्पभूधारक शेतकऱ्यांचा गट करावा लागतो. जिल्ह्यात तुतीची लागवड सुरू असून, ऑक्टोबरपर्यंत लागवड करता येईल. लागवडीनंतर चार महिन्यांत उत्पादन सुरू होते. - विनीत पवार, जिल्हा रेशीम विकास अधिकारी

टॅग्स :रेशीमशेतीशेतकरीशेतीपीकव्यवसायसोलापूर