India's First Residue Free Agriculture Exhibition Pune : भारतातील पहिलेच रेसिड्यू फ्री प्रात्यक्षिक पिकांच्या कृषी प्रदर्शनाची काल (ता. १०) पुण्यात सांगता झाली. कृषी महाविद्याय पुणे, जिल्हा परिषद पुणे, महाराष्ट्र राज्य कृषी विभाग, भारत सरकार कृषी विभाग आणि आत्मा विभागाकडून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, ६ मार्च ते १० मार्च रोजी या प्रदर्शनाचे पुणे कृषी महाविद्यालयाच्या फिल्डवर आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी जवळपास ८० पेक्षा जास्त प्रात्यक्षिक पिकांचे प्लॉट तयार करण्यात आले होते. विशेष म्हणजे हे सर्व प्लॉट कमीत कमी रासायनिक खतांचा वापर करून तयार करण्यात आले होते.
या प्लॉटमध्ये परदेशी भाजीपाला, भारतीय भाजीपाला,अन्नधान्ये, कडधान्ये आणि तेलबिया पिकांचे प्रात्यक्षिके दाखवण्यात आले होते. यासोबतच जिल्हा परिषदेच्या उमेद अभियानाकडून महिला स्वयंसहाय्यता गटासाठी त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी स्टॉलही लावण्यात आले होते. तर आत्मा अंतर्गत स्थापन झालेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही त्यांचे उत्पादने विक्री करण्यासाठी स्टॉल देण्यात आले होते.
या पाच दिवसांच्या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासोबतच रेसिड्यू फ्री शेती, नैसर्गिक शेतीसाठी लागणाऱ्या जैविक निविष्ठा तयार करणे, घरगुती भाजीपाला कसा पिकवायचा, विषमुक्त अन्न कसे पिकवायचे अशा विविध संकल्पनेवर जनजागृती करण्यात आली.
या पाच दिवसांमध्ये या प्रदर्शनाला राज्यभरातील आणि पुणे शहरातील ५० हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी भेट दिली. या प्रदर्शनाच्या व्यवस्थापनासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठा हातभार लावला आहे.
कृषी महाविद्यालय पुणेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने यांच्या पुढाकारामुळे हा कार्यक्रम पार पडला असून पुढच्या वर्षी यापेक्षाही चांगल्या प्रदर्शनाचे आयोजन कृषी महाविद्यालयाकडून करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.