आपल्या ताटातील अन्न कुठून येतं? आपण जो भाजीपाला खातो तो रेसिड्यू फ्री आहे का? त्यामध्ये किती टक्के रसायनं किंवा विष आहे? हा विचार आपण कधी केलाय? नाही ना...? या सर्व प्रश्नांकडे डोळे उघडे ठेवून पाहायला लावणारं कृषी प्रदर्शन पुणेकरांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि प्रत्येक नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलंय. पुणे कृषी महाविद्यालयाने हा पुढाकार घेतलाय.
देशातीच पहिलेच रेसिड्यू फ्री म्हणजेच 'रसायन अवशेष मुक्त शाश्वत शेती' प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शन पुण्यात आयोजित करण्यात आले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि पुणे कृषी महाविद्यालयाच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीसाठी प्रोत्साहित करणे आणि 'फॅमिली फार्मर'सारखी एक अभूतपूर्व संकल्पना रूजण्यासाठी या प्रदर्शनातून जनजागृती करण्यात येणार आहे.
उद्देश
शेतीमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेला रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रीय खतांचा वापर वाढावा आणि शेतकऱ्यांना रासायनमुक्त शाश्वत शेती पद्धती अवलंबण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि साधनांची माहिती देणे हाच या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे.
शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रीय, रेसिड्यू फ्री आणि शाश्वत शेतीचा अवलंब केला पाहिजे, नागरिकांना रेसिड्यू फ्री, केमिकलमुक्त, सुरक्षित आणि आरोग्यदायी अन्न खायला मिळालं पाहिजे, यासोबतच शहरातील प्रत्येकाला आपण काय खातोय? याचा अंदाज आला पाहिजे यासंदर्भातील जागृती व्हावी आणि शेतकऱ्यांनी रासायनिक अवशेषमुक्त शाश्वत शेतीचा मार्ग स्विकारावा हाच उद्देश या प्रदर्शनाचा आहे.
'फॅमिली फार्मर'
जसा प्रत्येक कुटुंबासाठी एक फॅमिली डॉक्टर ठरवलेला असतो त्याप्रमाणे फॅमिली फार्मर का नको? ज्याप्रमाणे आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला आपण डॉक्टरला पैसे देतो त्याप्रमाणेच आपण रोज खातो ते अन्न रसायनमुक्त आणि ताजे असावे यासाठी आपण थेट शेतकऱ्यांना का पैसे देत नाही? फॅमिली डॉक्टरप्रमाणे फॅमिली फार्मर ही संकल्पना राबवण्यासाठी या प्रदर्शनामध्ये प्रामुख्याने जनजागृती केली जाणार आहे.
काय असेल प्रदर्शनात?
या प्रदर्शनामध्ये ५० पेक्षा जास्त रेसिड्यू फ्री पिकांचे प्रात्यक्षिके पाहायला मिळणार असून, राज्यातील कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालये, कृषी विभाग आणि कृषी क्षेत्राशी संलग्न विभाग यामध्ये सहभागी होणार आहेत.
हायटेक शेती, पॉलिहाऊसमध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध पिकांची शेती, हायड्रोपोनिक शेती, एरोफोनिक शेती, नर्सरी तंत्रज्ञान, विद्यापिठाने, महाविद्यालयाने आणि कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेले एआय तंत्रज्ञान आधारित मोबाईल अॅप, शेती क्षेत्रातील एआय तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान पाहण्याची संधी मिळणार आहे.
गांडूळ खत प्रकल्प, बायोचार प्रकल्प, कंपोस्ट खत, अशा नानाप्रकारच्या प्रयोगांचे प्रात्यक्षिके आणि रासायनिक अवशेष मुक्त कृषी तंत्रज्ञान, जैविक कृषी पध्दती, मातीचे आरोग्य व्यवस्थापन आणि रासायनिक तणनाशक, किटकनाशकांचा वापर कमी करून, लागवड खर्चात बचत करून उत्पादन वाढविणाऱ्या शेती पध्दतीचे प्रात्यक्षिके असणार आहेत.
रानभाज्या महोत्सव, जुगाड, सन्मान अन् बरंच काही
देशी आणि गावरान रानभाज्यांची पुणेकरांना माहिती व्हावी यासाठी खास रानभाज्यांचे प्रदर्शन ठेवण्यात येणार आहे. शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या नवउद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी घरीच बनवलेले जुगाड या ठिकाणी पाहायला मिळणार असून राज्याच्या कृषी विभागाने कृषीभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांचा सन्मानही यावेळी केला जाणार आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि शिबिरांचेही आयोजन करण्यात आले आहे.
कधी आणि कुठे?
पुणे कृषी महाविद्यालयाच्या फिल्डवर या प्रदर्शनाचे आयोजन ६ मार्च ते १० मार्च यादरम्यान केले आहे. पुणेकरांना आणि नागरिकांना हे प्रदर्शन पाहण्याची संधी मिळणार आहे.