महेश देसाई
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यात परतीच्या पावसाने जोर केला असून, त्यात ढगाळ हवामानाने विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे तालुक्यातील द्राक्षबागांवर मोठ्या प्रमाणावर डाउनी, करपा व घडकुजीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे आगाप द्राक्षबागा उध्वस्थ होण्याच्या मार्गावर आहेत.
डाउनीने व सद्या द्राक्षे देण्याच्या मार्गावर असलेल्या द्राक्षे चिरत आहेत, त्यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने वेळेत पंचनामा करून जास्तीत जास्त नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहेत.
कवठेमहांकाळ तालुक्यात डाउनीचा सर्वाधिक फटका आगाप द्राक्षबागायतदार, शेतकरी यांना बसलेला आहे. फुलोऱ्यात असलेल्या द्राक्षबागांच्या घडामध्ये पावसाचे पाणी साचल्याने व ढगाळ वातावरण यामुळे बागेतील घड कुजून जात आहेत.
पहिल्या, दुसऱ्या डिपिंगच्या अवस्थेत असलेल्या बागेतील पानावर व घडावर डाउनीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पहाटेच्या वेळी दव पडल्याने या रोगाचा प्रसार झपाट्याने होत आहे.
बाजारात डाउनीस रोखण्यासाठी मिळणारी औषधे कुचकामी ठरत आहेत. वातावरण बदलले नाही आणि डाउनी आटोक्यात आला नाही तर हंगाम वाया जाईल. औषधे, मजुरांवरील खर्च डोक्यावर कर्ज म्हणून राहणार आहे. औषधांच्या दर्जावर शासनाचे नियंत्रण नाही.
त्यामुळे सुमार दर्जाची औषधे बाजारात आली आहेत. त्यासाठी हजारो रुपये खर्च करूनसुद्धा रोग आटोक्यात येत नाही. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांच्या नुकसानीला शासनच जबाबदार आहे.
घडकुज व डाउनी रोगाने कवठेमहांकाळ तालुक्यातील द्राक्षबागांचे प्राथमिक पंचनाम्यात १२८६ शेतकऱ्यांचे सुमारे ७५१.७० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे व अन्य पंचनामे कृषी विभाग करीत आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तर त्यांचे पंचनामे केली जातील. नुकसानभरपाईसाठी शासनस्तरावर पाठवले जाईल. - रमेश भंडारे, तालुका कृषी अधिकारी, कवठेमहांकाळ
कर्ज काढून द्राक्षबागा केल्या. पावसाने द्राक्षबागा मातीत गेल्या, मात्र त्यांची चौकशी प्रशासन व लोकप्रतिनिधी करत नाहीत. नेते मंडळी निवडणुकीत व्यस्त आहेत. शासनाने नुकसानीचे पंचनामे करत द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी. - ऋतुराज पवार, द्राक्षबाग शेतकरी, जाखापूर