Join us

Revenue Administration : मराठवाड्याचा रखडलेला फेरफार प्रश्न मार्गी लागणार तरी कधी? 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 11:25 AM

मराठवाड्यात सध्या महसुल प्रशासन हा चर्चाचा विषय आहे. का ते जाणून घ्या माहिती. (Revenue Administration)

विकास राऊत

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगाव-रंजेबुवा येथे नुकताच तलाठ्याचा खून झाल्यानंतर महसूल प्रशासन टॉप टू बॉटम हादरले आहे.  खुनामागे फेरफार रखडल्याचे सकृतदर्शनी दिसत असले तरी तपासाअंती नेमके कारण समोर येईल. 

दरम्यान, मराठवाड्यात तलाठी, मंडळ अधिकारी स्तरावर रखडलेल्या फेरफारचे प्रकरण या घटनेमुळे चव्हाट्यावर आले आहे. सुमारे ११ हजार फेरफार आठही जिल्ह्यांत रखडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

१५ दिवस, ३० दिवस आणि ४५ दिवसांत फेरफार मंजूर होण्याबाबतचे महसुली नियम असतानादेखील सामान्यांना तलाठी कार्यालयात सामान्यांचा हेलपाटे मारूनही न्याय मिळत नाही. हा प्रकार संयमाच्या बाहेर गेल्यानंतर सामान्यांचा उद्रेक होण्यासाठी घटनादेखील अधुनमधुन घडतात. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अब्दी मंडीतील शत्रू संपत्तीत घेतलेले फेरफार मात्र दोन दिवसांत मंजूर केले जातात. मग सामान्यांचे फेरफार होण्यास विलंब का होतो? असा प्रश्न आहे.

फेर घेण्याचा कालावधी किती?

• सुमारे ८ हजार ५५० गावे विभागात आहेत. ७६ तालुके आहेत. रोज जमीन खरेदी-विक्रीचे ६०० हून अधिक व्यवहार होतात.

• त्या व्यवहारांचे फेर झाल्याविना सातबाऱ्यावर जुन्या मालकाचे नाव रद्द होऊन नवीन मालकाचे नाव लागत नाही. यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी स्तरावरच निर्णय होत असतात. त्यासाठी १५ ते ४५ दिवसांचा साधारण कालावधी आहे.

आयुक्त हिंगोलीला रवाना...

महसूल खात्याच्या अव्वर सचिवांनी विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांना फोन करून हिंगोलीत जाण्याच्या सूचना केल्यानंतर बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आयुक्त रवाना झाले. दरम्यान, राज्य तलाठी महासंघाने वसमतमधील घटनेप्रकरणी राज्य बंद करण्याचा निर्णय घेण्याचे ठरविले आहे. किती फेर प्रलंबित हे तपासावे लागेल.

जिल्हा  रखडलेले फेरफार
छत्रपती संभाजीनगर  २ हजार ३००
जालना१ हजार २००
बीड१ हजार ५०
परभणी   १  हजार ३२०
नांदेड १ हजार ७१०
हिंगोली  ७००
धाराशिव१ हजार ३२१
लातूर१ हजार ३००

 

किती फेर प्रलंबित हे तपासावे लागेल

विभागातील जिल्हा निहाय किती फेरफार प्रलंबित आहेत, याची माहिती घ्यावी लागेल. -नयना बोंदार्डे, महसूल उपायुक्त

टॅग्स :शेती क्षेत्रमहसूल विभागहिंगोली