Join us

भातपीक नुकसानग्रस्तांना भरपाई मिळायलाच हवी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 12:51 PM

चार महिने अथक परिश्रम घेऊन बळीराजाला आता भाताचा दाणा पाहायला मिळाला आहे. आतापर्यंत. जिल्हात ८० टक्के क्षेत्रात भात कापणी झाली आहे. मात्र, काही भागात अवकाळीने भातपिकाचे मोठे नुकसान झाले असून, याबाबत प्रशासनाकडून पंचनामे होऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळायलाच हवी, अन्यथा शेती क्षेत्रात दरवर्षी होणारी घट आणखीनच वाढत जाणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी ६० हजार हेक्टरवर भात लागवड झाली होती. शेतकऱ्यांनी एककाडी, सुवर्णा, रुपाली, शुभांगी, कर्जत, साई, जया, वालय, वेळा आदी वाणांची लागवड केली होती. चार महिने अथक परिश्रम घेऊन बळीराजाला आता भाताचा दाणा पाहायला मिळाला आहे. आतापर्यंत. जिल्हात ८० टक्के क्षेत्रात भात कापणी झाली आहे. मात्र, काही भागात अवकाळीने भातपिकाचे मोठे नुकसान झाले असून, याबाबत प्रशासनाकडून पंचनामे होऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळायलाच हवी, अन्यथा शेती क्षेत्रात दरवर्षी होणारी घट आणखीनच वाढत जाणार आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार मागील आठवड्यात जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस बरसला होता. या पावसामुळे बळीराजाची तारांबळ उडाली. चांगला उतारा मिळणार या आशेवर असतानाच पावसाने तडाखा दिला. शेतात भात पीक भिजून नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे भातशेताकडे पाहून शेतकरी महिवरून गेला आहे. हातातोंडाशी आलेला घास असा हिरावून घेतल्याने त्याची चिंता वाढली आहे. शेतात ओलं झाल्याने उरलेली भातकापणी करावी कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

पीक पावसामुळे वाया जात असल्याने शेती पिकवावी की नाही, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागला आहे. गेली काही वर्षे अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांची भात कापणी एकाचवेळी आल्याने मजूर मिळेनासे झाल्याने मजुराचा भाव चांगलाच वाढला आहे. मजूर मिळत नसल्याने तारांबळ उडत आहे. प्रसंगी ४०० ते ६०० रुपये देऊनही मजूर मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. ज्या भागात अवकाळी पाऊस झाला आणि भातपीक भिजले, त्याला मोड येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

वन्यप्राण्यांकडूनही मोठ्या प्रमाणावर भातपिकाचे नुकसान होत आहे. वन्यप्राण्यांत रानगवे, रानडुक्कर यांची संख्या अधिक आहे. सध्या भातपीक कापणीयोग्य झाले असून, हे प्राणी त्याचे नुकसान करत आहेत. कष्टाने तयार झालेले भातपीक बघता बघता नष्ट झाल्याने शेतकरी दुःखी होत आहेत. रोज घडणाऱ्या या प्रकारामुळे शेतकरी त्रस्त आहेत. वन्यप्राणी उभे शेत उद्ध्वस्त करत आहेत. शेतकऱ्यांनी वन विभागाच्या कार्यालयात जाऊन वेळोवेळी रितसर निवेदने दिली आहेत. नुकसानभरपाईची मागणी केली आहे. वन विभाग वन्यप्राण्यांना मारू नका असे सांगतो, पण नुकसानभरपाई देताना दुर्लक्ष करतो. मग स्थानिक शेतकऱ्यांनी काय करायचे? आम्हाला लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा आक्रमक पवित्रा आता शेतकरी घेऊ लागले आहेत.

एकीकडे अनेक संकटांना तोंड देऊन भातशेती करायची आणि मग वन्यप्राण्यांकडून किंवा निसर्गाकडून तिचे होणारे नुकसान डोळ्यादेखत पाहत रहायचे? यातून शेतकरी राजा हतबल झाला आहे. त्यामुळे गेल्या आठ ते दहा वर्षांपासून भातशेती करण्याकडे कल दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. भात लागवडीखालील क्षेत्र घटत चालले आहे. भात कापणीच्या हंगामात विंचूदंशापासून नागरिकांनी सावध राहणे आवश्यक आहे. तर भात कापणीनंतरच दरवर्षी तापसरीची साथ फोफावते. त्यामुळे आवश्यक काळजी घेऊन कामे करण्याची गरज आहे यावर्षी पावसाने चांगली साथ दिल्याने भातशेती चांगलीच बहरली आहे परंतु अवकाळी पावसाचा काही नेम नसल्याने शेतकऱ्यांकडून घाईघाईने भात कापणी केली जात आहे. परंतु, भात कापणी करताना अनेकदा बेसावध असल्यामुळे विंचूदंशाचे प्रकार घडतात. त्यामुळे भात कापणी करताना शेतकन्यांनी स्वतः ची काळजी घेणे गरजेचे आहे.

महेश सरनाईकलेखक लोकमत सिंधुदुर्ग आवृत्तीमध्ये उपमुख्य उपसंपादक आहेत

टॅग्स :भातपाऊसकोकणसिंधुदुर्गशेतकरीवनविभागशेती