हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवीत बुधवारी दुपारी रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे बळीराजाची तारांबळ एकच उडाली. चांगला उतरा मिळणार या आशेवर असतानाच पावसाने तडाखा दिला. आज शेतात भात पीक भिजून नुकसान झाले आहे. वातवरण असेच राहिले तर मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.
अवकाळी पावसामुळे भातखेताकडे पाहून शेतकरी गहिवरून गेला आहे. हातातोंडाशी आलेला घास असा हिरावून घेतल्याने त्याची चिंता वाढली आहे. शेतात ओल झाल्याने उरलेलीभात कापणी करावी कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पीक पावसामुळे वाया जात असल्याने शेती पिकवावी की नाही, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागला आहे.
गेले काही वर्षे अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. पाऊस आणखी पडला तर यावर्षीही मोठ्या नुकसानीला आम्हाला सामोरे जावे लागणार आहे. पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांची भात कापणी एकाच वेळी आल्याने मजूरदार मिळेनासा झाला असल्याने मजुरदारांचा भाव चांगलाच वचारला आहे.-संदीप कदम, शेतकरी.
मजुरांअभावी तारांबळ
मजूर मिळत नसल्याने तारांबळ उडाली. प्रसंगी ४०० ते ६०० रुपये देऊनही मजूर मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.
भाताला येणार मोड
पडलेल्या पावसामुळे पिक भिजल्याने मोड येण्याची शक्यता शेतकरीवर्गाकडून व्यक्त केली जात आहे. पोलादपूर तालुक्यात बुधवारी झालेल्या पावसाने शेतात कापून ठेवलेल्या भातपिकाचे असे नुकसान झाले.