हवामान बदलाचा परिणाम भात पिकावरील किडींवरही होत असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे. तापमानात होणाऱ्या वाढीमुळे भातावरील तपकिरी तुडतुड्यांच्या वर्तनावरही परिणाम होत असून शेतीचे होणारे नुकसानही वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. शेतकऱ्यांनी वेळीच उपाय केल्यास हे नुकसान टळू शकते, असे संशोधकांचे म्हणणे आहे. किडींच्या वर्तनाबद्दल वेळीच समजले, तर त्यावर योग्य ते उपाय करून त्यांचा प्रतिबंध करता यावा आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना भात उत्पादनात फायदा व्हावा, या उद्देशाने हे संशोधन करण्यात आले.
नुकसानकारक तुडतुडे
भात पिकावर येणाऱ्या विविध किडींपैकी सर्वात नुकसानकारक कीड म्हणजे तपकिरी तुडतुडे (अर्थातच ब्राऊन प्लँथॉपर). ही कीड संपूर्ण आशियात भातासाठी विनाशकारी समजली जाते. तपकिरी तुडतुडे पिकावरील उतींमधून रस शोषून घेऊन 'हॉपर बर्न' करतात. याशिवाय भात रोपांवर विषाणूजन्य रोगांचा प्रसार करून अप्रत्यक्षपणे पिकाचे नुकसान करतात.
ज्यामुळे भाताचे मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि आर्थिक असे दोन्हीही नुकसान होते. तामिळनाडू कृषी विद्यापीठ (TNAU), कोईम्बतूर आणि इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स को-ऑपरेटिव्ह लिमिटेड, कोईम्बतूर येथील संशोधकांनी विविध तापमानात भातावर होणाऱ्या तपकिरी तुडतुड्यांच्या प्रादुर्भावाचा अलीकडेच अभ्यास केला आहे. त्यातून मिळालेले निष्कर्ष भात उत्पादकांना सावधतेचा इशारा देणारे आहेत.
असे झाले संशोधन
या संशोधनात वेगवेगळ्या तापमानात तुडतुड्यांच्या वर्तनाचा आणि त्यातून भात पिकावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला. त्यासाठी विद्यापीठाच्या नियंत्रित कक्षात भाताच्या शेतात असते तसेच वातावरण तयार करण्यात आले. या शिवाय कीड-रोगांसाठी सगळ्यात संवेदनशील समजल्या जाणाऱ्या (टीएन१) या वाणावर चाचणी करण्यात आली. फील्ड स्पेक्ट्रोरेडिओमीटर आणि वनस्पती निर्देशांकांचा वापर भातावर होणाऱ्या तुडतुड्यांच्या सुरुवातीच्या आणि उशीरा प्रादुर्भावाचा अभ्यास करण्यासाठी केला गेला.
काय आढळलं संशोधनात
टीमने नियंत्रित चेंबरमध्ये पाच स्थिर तापमानात (15°C, 20°C, 25°C, 30°C आणि 35°C) तुडतुड्यांपासून होणाऱ्या संसर्गाचा अभ्यास केला. तसेच तापमानाच्या प्रतिसादाचा अभ्यास केला. त्यात वेगवेगळ्या तापमानात भातामध्ये तुडतुड्याचा वेगवेगळा प्रादुर्भाव दिसून आला. कमी तापमानात, निरोगी वनस्पतींप्रमाणेच सुरुवातीच्या काळात तुडतुड्यांनी केलेल्या नुकसानीची लक्षणे दिसण्यास उशीर होतो. यात असे दिसून आले. तर उच्च तापमानात तुडतुड्यांच्या नुकसानीची लक्षणे पाचव्या दिवसापासून लवकर दिसून येतात, हे दिसून आले.
वातावरणातील तपमान जसजसे वाढते तसतसे कीटक-खाद्य वर्तन देखील वाढते. म्हणजेच भाताच्या पिकाचे नुकसान करण्याचे प्रमाणही वाढते. त्यातही तुडतुड्यांचा जलद प्रादुर्भाव 30°C आणि 35°C दरम्यान होतो, ज्यामध्ये 50% पेक्षा जास्त नुकसान पाचव्या ते दहाव्या दिवसापर्यंत होते, असेही संशोधकांना आढळून आले.
एस. शिवरंजनी, व्ही. गीतलक्ष्मी, एस. पझानिवेलन, जे.एस. केनेडी, एस. पी. रामनाथन, आर. गौथम आणि के. पुगझेंथी यांचा समावेश असलेल्या संशोधन पथकाने हे संशोधन केले.
शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
भातात युरिया किंवा नत्र खत जास्त प्रमाणात दिल्यास तपकिरी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढतो. म्हणून नेहमी प्रादुर्भाव होणाऱ्या शेतात नत्र खताची मात्रा वाजवी प्रमाणात द्यावी. भात लावणी दाट करू नये. दोन ओळींतील अंतर 20 सें.मी. आणि दोन चुडांतील अंतर 15 सें.मी. ठेवावे, तसेच रोपांची पट्टा पद्धतीने लागण करावी. शेतातील पाण्याचा निचरा नियमित करावा, पाणी बदलावे, असा सल्ला कीडकशास्त्रज्ञ देतात.
हवामान बदलाचा सामना करताना, शेतक-यांना सुधारित जैविक नियंत्रण , हवामान-प्रतिबंधक कृषी तंत्र आणि नवीन तांत्रिक नवकल्पनांची आवश्यकता आहे. आपल्या पिकावर आलेली कीड व रोग वेळीच ओळखून त्यांवर नियंत्रणाचे उपाय करणे आवश्यक असते.