Join us

तांदूळ २९ रुपये प्रतिकिलो, किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचे पाऊल...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2024 5:00 PM

केंद्र सरकारने किरकोळ बाजारात तांदूळ २९ रुपये प्रतिकिलोने विकण्याचा निर्णय घेतला आहे.

महागाईमुळे सर्वसामान्य त्रस्त आहेत.  तर दुसरीकडे शेतकऱ्यांना तांदळाला भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. नागरिकांना याची झळ बसू नये म्हणून केंद्र सरकारने किरकोळ बाजारात तांदूळ २९ रुपये प्रतिकिलोने विकण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या "भारत तांदूळ' या ब्रँडखाली याची विक्री केली जाणार आहे. यासोबतच सरकारने त्यांच्याकडील व्यापाऱ्यांना तांदळाच्या साठ्याची माहिती शुक्रवारपर्यंत सादर करण्यास सांगितले आहे. किमतीवर नियंत्रण राहावे, यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.

केंद्रीय अन्नधान्य सचिव संजीव चोपडा म्हणाले की, 'भारत' ब्रँडचा तांदूळ पुढील आठवड्यापासून ५ किलो व १० किलोच्या पाकिटात उपलब्ध करून दिला जाईल. निर्यातीवर काही प्रमाणात निर्बंध घातले तरीही वर्षभरात तांदळाच्या किमती वाढल्या आहेत.

वर्षभरात १५% महागला

तांदळाच्या किमती जवळपास १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. किमती नियंत्रणात राहाव्यात यासाठी सरकारने नॅशनल अॅग्रिकल्चरल को- ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन (नाफेड) आणि भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघ (एनसीसीएफ) या सहकारी संस्थांच्या माध्यमातून सरकारच्या केंद्रांमधून बाजारात अनुदानित तांदूळ २९ रुपये प्रतिकिलो या दराने विकण्याचा निर्णय घेतला.

सर्व पर्याय खुले

सध्या व्यापाऱ्यांना केवळ त्यांच्याकडील तांदळाच्या साठ्याची माहिती देण्यास सांगितले आहे. किती प्रमाणात साठा करावा, याबाबत काही सूचना दिल्या जाणार आहेत का, असे प्रसारमाध्यमांनी विचारले असता संजीव चोपडा म्हणाले की, तांदळाच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारकडे सर्व पर्याय खुले आहेत, असे चोपडा म्हणाले.

'निर्बंध हटविले नाहीत'

• केंद्र सरकारने याआधी २७.५० रुपये प्रतिकिलो या दराने गव्हाचे पीठ आणि ६० रुपये प्रतिकिलो दराने डाळ उपलब्ध करून दिली आहे.•तांदळावरील निर्यातबंदी उठवली जाईल, अशी अफवा पसरली आहे.• निर्यातीवरील हे निबंध हटविण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, असे चोपडा यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :भातशेतकरीमहागाई