चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर: साखर उद्योगाच्या वाढीसाठी पुढील दहा वर्षांचा रोडमॅप तयार झाला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने तो तयार केला आहे. त्याचे प्रकाशन येत्या १० ऑगस्टला नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे.
साखर उद्योग हा देशातील तिसऱ्या क्रमाकांचा उद्योग आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नात त्याचा वाटा १.१ टक्के आहे. २०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनविण्यात या उद्योगाचे योगदानही मोलाचे राहणार आहे. तथापि हा उद्योग सतत आर्थिक, नैसर्गिक अडचणींचा सामना करत असतो.
धोरण सातत्याचा अभाव हेही त्यातील एक महत्त्वाचे कारण आहे. या सर्व अडचणींवर मात करत या उद्योगाला प्रगतिपथावर नेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सूचनेनुसार हा रोडमॅप तयार करण्यात आला आहे.
सर्व घटकांचा विचारमुंबईतील पॉलिसी अॅडव्हाकसी रिसर्च सेंटर या संस्थेच्या सहकार्याने गेले तीन महिने साखर उद्योगातील सर्व घटकांशी बोलून, प्रश्नावली पाठवून, सखोल अभ्यासाद्वारे हा सर्वकष रोडमॅप तयार करण्यात आला आहे. त्यात ऊस उत्पादनांपासून साखर, इथेनॉल, जैव इंधन, ऊर्जा यासह उसापासून तयार होणाऱ्या सर्व घटकांचे पुढील दहा वर्षांत काय स्थान असेल. त्यांच्या वाढीसाठी किती वाव असेल, त्यासाठी काय करायला हये याचे विवेचन आकडेवारी आणि वस्तुस्थितीच्या आधारे (फॅक्टस् अॅन्ड फिगर्स) मांडण्यात आले आहे.
महासंघाच्या नूतन संचालक मंडळाने १६ फेब्रुवारीला केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांची भेंट घेतली होती. यावेळी झालेल्या चर्चेत शहा यांनी साखर उद्योगासाठी पुढील १० वर्षांचा रोडमॅप तयार करा. केंद्र सरकार आवश्यक ते पाठबळ देईल, असे सांगितले होते. त्यानुसार हा रोडमॅप तयार करण्यात आला आहे. - हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष, राष्टीय सहकारी साखर कारखाना महासंघ