Join us

वादळी वाऱ्यात रस्त्याच्या कडेची झाडे उन्मळून जाऊ नयेत! म्हणून करा या झाडांची लागवड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 11:19 AM

उद्यान अधीक्षक विजय पाटील यांचा वृक्षप्रेमींना सल्ला

शनिवारी सायंकाळी वादळी वारा आणि पावसामुळे छत्रपती संभाजीनगर शहरात देशी- विदेशी दोन्ही प्रकारची झाडे उन्मळून पडली. ही झाडे पडण्यामागे वेगवेगळी कारणे आहेत. तेव्हा या कारणांचा विचार अभ्यास करूनच रस्त्याच्या कडेला घरच्या बाजूला झाडे लावावीत.

पुढे सांगतांना वृक्षप्रेमींनी रस्त्याच्या कडेला झाडे लावायला हरकत नाही. मात्र झाड निवडताना शक्यतो देशी (भारतीय) झाड निवडले पाहिजे, असे आवाहन महापालिकेचे उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी केले.

शनिवारच्या वादळी वाऱ्यात शहरात ७५ पेक्षा अधिक झाडे उन्मळून पडली. शहरात झाड लावल्यानंतर त्याला पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा शिल्लक ठेवली जात नाही. काँक्रिटीकरण, पेव्हर ब्लॉक बसविले जातात.

झाडांची मुळे दोन प्रकारची असतात. एक खोलवर जमिनीत ३० ते ४० मीटरपर्यंत जातात, दुसऱ्या प्रकारची मुळे जमिनीच्या पृष्ठभागावर किंवा जमिनीतच वरवर पसरलेली असतात. म्हणून नेहमी चार ते पाच फूट झाडाच्या बुंध्याजवळचा भाग मोकळा सोडला पाहिजे.

रस्त्याच्या कडेला झाडे लावायला हरकत नाही. अलीकडे दुभाजकात कोणीही कोणतीही रोपे लावून मोकळे होतात. रोपे मोठे झाल्यावर ती हमखास उन्मळून पडतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूने शक्यतो लिंब, पिंपळ, शिरस, कांचन, आंबा, पळस अशी झाडे लावली पाहिजेत. कमी पाण्यातही ही झाडे लवकर मोठी होतात.

खंडपीठाचे आदेश; तरीही...

मुंबई खंडपीठाने एका जनहित याचिकेच्या सुनावणीत १२ जुलै २०२३ रोजी आदेश दिला. या आदेशात झाडांच्या आसपासची जागा मोकळी ठेवावी, असे आदेश दिले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी महापालिका आयुक्त्तांनी करावी, त्याचा अहवाल राष्ट्रीय हरित लवादाकडे सादर करावा. छत्रपती संभाजीनगर महापालिकेनेही या आदेशाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी वृक्षप्रेमींनी केली.

टॅग्स :वादळपाऊसअपघात