रोहा तालुक्यातील सांगडे गावचे कृषिनिष्ठ शेतकरी केशव खरीवले यांच्या कलिंगड पिकाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळाली आहे. त्यांनी पिकविलेले कलिंगडाचे पीक थेट दुबईला रवाना झाले आहे. या शेतकरी कुटुंबाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
शेती क्षेत्रात नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करणारे केशव खरीवले यांनी या वर्षीच्या शेतीच्या हंगामात तालुक्यातील घोसाळे येथे कलिंगड पिकाची शेती केली. विकसित बियाणांचा वापर करून नवा प्रयोग त्यांनी केला. त्यांच्या या प्रयोगास चांगले यश मिळाले.
खरीवले व त्यांच्या कुटुंबीयांनी शेतामध्ये घेतलेल्या कष्टाने कलिंगड पिकाचे उत्पादनही चांगले आले, याशिवाय फळेही आकाराने मोठी व गोड आली. कलिंगड पिकाचा दर्जा व मोठे फळ आल्याने मुंबई तसेच येथील काही घाऊक कलिंगड विक्रेते, व्यापाऱ्यांनी खरीवले यांच्या शेतीतील कलिंगड खरेदी करण्यास पसंती दिली.
केशव खरीवले यांचे कौतुककलिगड आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीसाठी गेल्याने शेतकरी केशव खरीवले यांचे कौतुक होत आहे. मुंबईतील घाऊक व्यापाऱ्यांचे दुबईतील फळ व्यापाऱ्यांशी असलेल्या व्यावसायिक संबंधातून दुबईतील व्यापाऱ्यांकडे खरीवले यांचे कलिंगड पाठविले. दुबईमध्ये कलिंगड पसंतीस उतरल्याने पिकाला चांगला दर मिळून सर्वच्या सर्व पिकलेला मालसदर व्यापाऱ्यांनी खरेदी केला आहे.
अधिक वाचा: जिगरबाज दोन मित्रांची वाट्याने शेती... शिक्षणाला अनुभवाची जोड अन् यशाला नाही कशाची तोड